धुळे जिल्ह्यात सर्वत्र पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 03:25 PM2017-12-05T15:25:05+5:302017-12-05T15:26:52+5:30
अवकाळी : ओखी वादळाचा परिणाम
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : अरबी समुद्रातून महाराष्टÑाच्या किनारपट्टीवर येऊन धडकलेल्या ओखी वादळाचे परिणाम जिल्ह्यातही प्रत्ययास आले असून मंगळवारी दुपारपासून पावसाला सुरूवात झाली. सोमवारी रात्रीपासूनच आकाशात ढगांची गर्दी झाली होती. मंगळवारी आभ्राच्छादित वातावरणामुळे सूर्यदर्शन होऊ शकले नाही. पावसाची संततधार सुरूच आहे. या पावसामुळे कांदा, कापूस व चाºयाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असून गारठ्यातही वाढ झाली आहे.
जिल्ह्यात ओखी वादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा परिणाम सोमवारीच दिसून आले होते. प्रखर ऊन असताना ढगांची गर्दी होऊ लागली. संध्याकाळनंतर आकाश ढगांनी भरून गेले होते. परतीच्या पावसानंतर सावरत असलेल्या शेतकºयांना पुन्हा अवकाळी पावसाला सामोरे जावे लागले आहे. आधी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास तुरळक पाऊस झाला. त्यानंतर दुपारी सव्वावाजेच्या सुमारास रिपरिप पावसाला सुरूवात होऊन नंतर त्याचा जोर वाढला. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्यावरील वाहतूक मंदावली. तासाभरानंतर पाऊस ओसरला. परंतु रिपरिप सुरू होती. यामुळे गारठ्यात वाढ झाली असून अनारोग्य पसरण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
कांदा, कपाशीचे नुकसान
या पावसामुळे काढणीवर आलेल्या व नव्याने लागवड झालेल्या कांद्याचेही नुकसान होत आहे. तसेच बोंडे फुटलेली कपाशी ओली होत असल्याने आधीच त्रस्त असलेला शेतकरी हवालदिल झाला आहे.
या पावसामुळे शेतात उघड्यावर रचून ठेवलेला चाराही ओला होऊन काळा पडणार आहे. त्यामुळे गुरांसाठी चारा कसा उपलब्ध करावा, अशा पेचात आता पशुपालक पडले आहेत.