तेली समाजातर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर ८ मार्चला मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:12 PM2018-02-23T12:12:36+5:302018-02-23T12:13:50+5:30
दोंडाईचा बालिका अत्याचार प्रकरण : घटनेचा निषेध व आरोपीस अटकेची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : दोंडाईचा येथील बालिका अत्याचार प्रकरणाचा निषेध करुन फरार अज्ञात आरोपीस त्वरीत अटकेची एकमुखी मागणी जिल्हा तिळवण तेली समाजाच्या बैठकीत गुरुवारी सर्व मान्यवरांनी केली. तसेच जागतिक महिला दिनी ८ मार्चला यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
शहरातील ग.न.२ मधील तेली पंचायत भवनात सायंकाळी चार वाजता यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठक धुळे महानगर तेली पंचायतचे अध्यक्ष माजी महापौर भगवान रामभाऊ करनकाळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस महापौर कल्पना महाले, माजी महापौर जयश्री अहिरराव, नगरसेविका प्रतिभा चौधरी, महानगर अध्यक्षा सुलोचना चौधरी, सेक्रेटरी भाऊसाहेब देविदास चौधरी, महादू अंबर चौधरी, युवराज महादू चौधरी, रामेश्वर धोंडू चौधरी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.
मराठा क्रांती मोर्चातर्फे पाठिंबा
तेली समाजातर्फे आयोजित आंदोलनास मराठा क्रांती मोर्चातर्फे पाठिंबा जाहीर करण्यात आला. पाठिंब्याचे पत्रक मनोज मोरे, साहेबराव देसाई, स्वप्निल निंबाळकर, हेमंत भडक, देवेंद्र पाटील, निलेश काटे, सचिन सुडके यांनी दिले. तसेच बैठकीस सर्व पदाधिकारी उपस्थितही होते.