रँगिंगग्रस्तांना समुपदेशनाची नितांत गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 12:03 PM2019-12-20T12:03:31+5:302019-12-20T12:04:03+5:30
सी.गो. पाटील महाविद्यालयात कार्यशाळा : मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मांडणी; कायदे आणि न्याय विषयावर मार्गदर्शन
साक्री : समाजात शारीरिक, मानसिक, आर्थिक, वैचारिक त्रास देऊन अनेक प्रकारच्या रॅगिंग केल्या जातात. मात्र सहनशील व्यक्ती त्यातून मार्ग काढतात आणि ज्यांची सहनशीलता संपते ते आत्महत्या करून घेतात. यासाठी कार्यशाळांमार्फत जागृती व समुपदेशनाने अनेकांचे प्राण वाचू शकतात, असे प्रतिपादन धुळे येथील ए.डी.आर. कोर्टचे डॉ.योगेश सूर्यवंशी यांनी केले.
साक्री येथील सी.गो. पाटील महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उमवि जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी विकास विभागामार्फत आयोजित रॅगिंग प्रतिबंध समुपदेशन कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ.योगेश सूर्यवंशी बोलत होते. यावेळी अॅड.अमित दुसाने, जळगाव विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा.डॉ. संजय सोनवणे, प्राचार्य डॉ.आर.आर. अहिरे, उपप्राचार्य डॉ.आनंत पाटील, प्रा.सुनील पालखे, समन्वयक डॉ.लहू पवार, डॉ.अशोक निकम, डॉ.ज्योती वाकोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
अॅड.सूर्यवंशी यांनी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि विभागीय स्तरावरचे अनेक उदाहरणे देऊन रॅगिंग प्रतिबंध समुपदेशन कार्यशाळेत मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मांडणी केली.
अॅड.अमित दुसाने यांनी शाळा महाविद्यालय स्तरावरील रॅगिंग व त्या विषयीचे विविध कायदे आणि न्याय या विषयी मार्गदर्शन केले.
विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे जिल्हा समन्वयक प्रा.एच.एम. शेख यांनी विद्यार्थ्यांना, वर्गात, प्रवास करतांना, विविध, स्पर्धांमध्ये सहभागी असतांना महाविद्यालयीन जीवनातील दैनंदिन गोष्टींची चर्चा करून समुपदेशन केले.
रॅगिंग ही विकृती आहे. नेहमी दुबळ्या व्यक्तीवरच विविध प्रकारचे अत्याचार केले जातात. म्हणून पिडीतांना आत्महत्येच्या दारापर्यंत जावे लागते. मात्र आत्महत्या करणे हा रॅगिंगवर पर्याय नाही. यासाठी सहनशील राहून एकमेकांमधील सुसंवाद वाढवणे गरजेचे असल्याचे मार्गदर्शन साक्री येथील डॉ.बी.डी. अहिरराव, मेमोरियल ट्रस्टच्या संचालिका डॉ.विजया अहिरराव यांनी केले.
उमवि प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॉ.संजय सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.आर.आर. अहिरे यांनी ‘एक मेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या उक्तीने जगण्याची सवय लावली तर सर्वांना यशस्वी जीवन जगता येते, असा सल्ला अध्यक्षीय मनोगतात दिला. प्रास्ताविक कार्यशाळेचे समन्वयक डॉ.लहू पवार यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.ज्योती वाकोडे, तर आभार डॉ.अशोक निकम यांनी मानले.