कासारे येथे उद्या रथयात्रा; तयारी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 01:32 PM2019-10-27T13:32:00+5:302019-10-27T13:32:49+5:30
स्वच्छतेसह रंगरंगोटी । विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
कासारे : येथे कार्तिक शुद्ध द्वितीया भाऊबीजेच्या मुहूर्तावर मंगळवारी २९ रोजी रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
रथयात्रेच्या कार्यक्रमास सकाळी ८ वाजेपासून सुरुवात होणार आहे. यादिवशी सकाळी ८.३० ते ९.३० या वेळात बालाजी मंदिरात बालाजी अभिषेक व पूजा साक्री तालुक्यातील निमंत्रित माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य व विविध मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक होऊन मग बालाजी मंदिर, विशवकर्मा चौक, कुंभारगल्ली मार्गे बाजारपेठ, बसस्टँड ते गावदर्जा व परत याच मार्गे बालाजी मंदिर अशी संपन्न होईल.
या निमित्ताने ३० रोजी बुधवारी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत बाजारपेठ कासारे या ठिकाणी कुस्त्यांची दंगल आयोजित केली असून त्यात विविध भांडी व रोख रकमेच्या बक्षिस असे आयोजन सालाबादप्रमाणे आहे.
उत्तर महाराष्ट्रासह कुस्तीगीरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. तसेच या रथयात्रे निमित्त व्यापारी व दुकानदारांनी आपली दुकाने थाटून यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन रथयात्रा समितीच्या वतीने तमाम भाविकांना करण्यात आले आहे. या रथयात्रेची संपूर्ण तयारी अंतिम टप्यात पूर्ण झाली असून परिसरासह तालुक्यातून व जिल्ह्यातून सर्व भाविकांनी या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.