पॉज मशिनला रेशन दुकानदारांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 10:50 PM2020-05-04T22:50:03+5:302020-05-04T22:50:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पॉज मशिन वापराचा निर्णय रद्द करावा, दुकानदारांना विमा संरक्षण द्यावे, अशी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पॉज मशिन वापराचा निर्णय रद्द करावा, दुकानदारांना विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदारांनी केली आहे़
ग्रामीण विभाग धुळे तालुका स्वस्त धान्य दुकानदार सेवा संस्थेने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून ही मागणी केली़
निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये यासाठी एप्रिल महिन्याच्या धान्याचे वितरण पॉज मशिनवर ठसे न घेता वितरीत करण्याचे आदेश शासनाने दिले होते़ आता मे महिन्याचा धान्याचा कोटा प्राप्त झाला असून या धान्याचे वितरण करताना रेशनकार्ड धारकांचे अंगठ्याचे ठसे घ्यावेत असे आदेश केंद्र शासनाने ३० एप्रिलच्या परिपत्रकान्वये दिले आहेत़ ग्राहकांचे ठसे घेतले तर त्यातून कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती आहे़ स्वस्त धान्य दुकानदार अतीशय कमी कमीशनवर काम करतात़ पॉज मशिनमुळे या दुकानदारांना लागण झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटूंबावर होईल़ यासाठी लाभार्थ्यांचे ठसे न घेता गेल्या महिन्याप्रमाणेच पॉज मशिनवर दुकानदाराचे ठसे घेवून धान्य वितरणास मुभा द्यावी, अशी मागणी ग्रामीण स्वस्त धान्य दुकानदार सेवा संस्थेचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, तालुकाध्यक्ष विलास चौधरी, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, खजिनदार लक्ष्मण वाघ, सचिव देविदास मोरे, सहसचिव के़ डी़ पाटील, हिम्मत बागुल, चेतन कंखर, कौतिक दंगल यांच्यासह स्वस्त धान्य दुकानदारांनी केली आहे़
सध्या केशरी रेशन कार्ड धारकांना स्वस्त दारात धान्याचे वितरण सुरू आहे़
आत्महत्या अभिप्रेत आहेत का?
कोरोनाच्या लढ्यात जिल्हा प्रशासन, पोलिस आणि आरोग्य यंत्रणेप्रमाणेच स्वस्त धान्य दुकानदार देखील योगदान देत आहेत़ शासनाने कोणतेही नियोजन न करता धान्य वितरणाच्या योजना जाहीर केल्याने गर्दी उसळली आहे़ लॉकडाउनच्या काळात कुणाचेही अन्नावाचून हाल होवू नयेत यासाठी धान्य दुकानदार जीव धोक्यात घालून धान्याचे वितरण करीत आहेत़ स्वस्त धान्य दुकानदारांनी सुरूवातीलाच संरक्षण कीट आणि विमा संरक्षणाची मागणी केली होती़ परंतु त्याकडे दुर्लख केले़ याउलट आता पॉज मशिनचा आग्रह धरला जात आहे़ या मशिनवर सर्व लाभार्थ्यांचे थंब घेतल्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती आहे़ दुकानदार आणि त्यांच्या कुटूंबालाही धोका आहे़ शासनाला स्वस्त धान्य दुकानदारांच्या आत्महत्या अभिप्रेत आहेत का? असा प्रश्न रेशन दुकानदारांचे नेते महेश घुगे यांनी उपस्थित केला आहे़