प्रलंबित मागण्यांसह तांत्रिक अडचणींविरोधात रेशन दुकानदार एकवटले; जेलरोडवर जोरदार धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2023 12:59 PM2023-12-02T12:59:15+5:302023-12-02T12:59:33+5:30
रेशन दुकानदारांना तुटपुंजे कमिशन दिले जाते. त्यावर कुटुंबाची गुजरान करतांना रेशन दुकानदार मेटाकुटीला आला आहे.
आपल्या विविध प्रलंबीत मागण्यांसह तांत्रिक अडचणींविरोधात आज रेशन दुकानदारांनी एकत्रित येत क्युमाईन क्लब, जेल रोडवर जोरदार धरणे आंदोलन केले. अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसीन परवानाधारक महासंघाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, उपाध्यक्ष भाईदास पाटील, तालुकाध्यक्ष विलास चौधरी, आर. आर. पाटील, राजु टेलर, प्रविण खैरनार आदींसह रेशन दुकानदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रेशन दुकानदारांना तुटपुंजे कमिशन दिले जाते. त्यावर कुटुंबाची गुजरान करतांना रेशन दुकानदार मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे श्वाश्वत उत्पन्नाच्या हमी शिवाय पर्याय नाही. तसेच पॉस मशीवर सर्व्हर पारंपारिक तांत्रिक अडचणींमुळे दुकानदाराला जगणे मुश्कील झाले आहे. यासर्व बाबींविरुध्दचा लढा हा आंदोलनाने सुरू झाला असून यापुर्वी केरोसीन व्यवसाय संपुष्टात आणून ५५ हजार कुटुंब रस्त्यावर आली. त्याची कुठलीही दखल शासनाने घेतली नाही. आपण एकत्र नसल्यामुळे काहीही करू शकलो नाही. मात्र ती वेळ पुन्हा येवू नये, यासाठी सर्व रेशन दुकानदारांनी संघटीत व्हावे, असे आवाहनही यावेळी संघटनेच्या पदाधिऱ्यांनी केले.
यावेळी जोरदार निदर्शने करीत शासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांनी सांगितले की, राज्य आणि केंद्र सरकार यांच्या जबाबदारी नुसार फेब्रुवारी २०२० मध्ये लागु असलेले विश्व खाद्य कार्यक्रम रिपोर्टनुसार लागु करण्यात यावा. नेटवर्क सरवर डाऊन असणे बोटांची जुळवणी किंवा ठसे मशीनवर न जुळणे त्यामुळे ग्राहकांमध्ये मोठा गैरसमज होतो. म्हणून केंद्र आणि राज्य शासन यांनी १६ डिसेंबर २०२० च्या राज्यसभेत चर्चा अंती विषयान्वये पर्यायी व्यवस्था निश्चित करण्यात यावी. धान्य वाटपाचे कमिशन तुटपुंज्य असल्याने तेही वेळेवर मिळत नसल्याने इतर राज्यात (उदा. गुजरात, छत्तीसगड यासह अन्य राज्यातील) ज्या दुकानदारांना मिळते त्यानुसार महाराष्ट्र राज्यात व धुळे जिल्ह्यात मानधन तत्वावर सुरु करण्यात याव्या यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.