जगप्रसिद्ध अजिंठा लेणीकडे पर्यटकांची पाठ
By admin | Published: April 10, 2017 04:21 PM2017-04-10T16:21:15+5:302017-04-10T16:21:15+5:30
वाढलेले तापमान, मुलभूत सुविधांचा अभाव व वाढलेल्या प्रवेश शुल्का मुळे जगप्रसिध्द अजिंठा लेणीकडे देशी व विदेशी पर्यटकांनी पाठ फिरविली आहे.
Next
मुलभूत सुविधांचा अभाव : हॉटेल व रिसॉर्ट व्यवसायावर परिणाम
फदार्पूर,दि.10- वाढलेले तापमान, मुलभूत सुविधांचा अभाव व वाढलेल्या प्रवेश शुल्का मुळे जगप्रसिध्द अजिंठा लेणीकडे देशी व विदेशी पर्यटकांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे महिनाभरापासुन या ठिकाणी शुकशुकाट जाणवत आहे. यामुळे परीसरातील व्यावसायीक चांगलेच अडचणीत आले आहे.
प्रत्येक वर्षी ऑक्टोंबर ते जानेवारी व एप्रिल ते जुन या कालावधीत अजिंठा लेणीमध्ये पर्यटकांची वर्दळ असते. एप्रिल मध्ये उन्हाळी सुटय़ा लागत असल्याने या काळात पर्यटकांची चांगली गर्दी असते. या काळात दररोज हजारो पर्यटक अजिंठा लेणीला भेट देत असतात. मात्र यावर्षी जानेवारी महिन्यानंतर लेणी कडे पर्यटकांनी जी पाठ फिरवली ती एप्रिल महिना लागला तरी कायम आहे. पर्यटक भेटी देतील या आशेने अनेक लहान मोठय़ा व्यापा:यांनी खाजगी कर्ज तसेच नातेवाईक, मित्र मंडळी कडुन उसनवारीने पैसे घेवून आपल्या दुकानात माल भरुन घेतला. आता पर्यटक नसल्याने हे कर्ज कसे परत करावे ही चिंता व्यावसायिकांना आहे.
हॉटेल्स आणि रिसॉर्ट रिकामेच
देशी व विदेशी पर्यटकांच्या सुविधेसाठी फदार्पूर (ता.सोयगाव) येथे एमटीडीसी सह अनेक खाजगी हॉटेल्स व रेसॉर्ट आहेत. मात्र सध्या पर्यटक नसल्याने हे सर्व हॉटेल्स व रिसॉर्ट ओस पडले आहेत. हे हॉटेल्स व रिसॉर्ट चालविण्यासाठी दररोज लागणारा हजारो रुपयाचा खर्च व कर्मचा:यांचे वेतन कसे काढावे या चिंतेत येथील हॉटेल व्यावसायीक आहे.
अजिंठा लेणीतील पर्यटन घसरण्याची प्रमुख कारणे
सध्या उन्हाचा पारा वाढला आहे. त्यामुळे अजिंठा लेणीतील पर्यटकांची संख्या घटली असे म्हटले जात आहे. मात्र ऑक्टोंबर ते जानेवारी च्या कालखंडात ही गेल्या काही वर्षा च्या तुलनेत अजिंठालेणीत अत्यंत कमी पर्यटकांनी भेट दिली आहे. येथे येणा:या पर्यटकांना मिळणा:या मुलभुत सुविधांचा अभाव हे देखील आहे. लेणीत येणा:या हजारो पर्यटकांना उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी कोणतीही सुविधा नाही. पिण्याच्या पाण्यासाठी पर्यटकांना अनेक ठिकाणी भटकंती करावी लागते. काही महिन्यांपासून तिकीट दरात व सुविधा शुल्कात भरमसाठ वाढ झाली आहे. अजिंठालेणी बघण्यासाठी एका भारतीय पर्यटकाला सुमारे 114 रुपये तर विदेशी पर्यटकांना 584 रुपये मोजावे लागतात (हा खर्च केवळ 4 किमी च्या अंतरात प्रति व्यक्ती करावा लागतो ). फदार्पूर टि.पॉईंट ते अजिंठालेणी या चार किमी च्या अंतरात रस्त्याची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. (वार्ताहर).