धुळे जिल्ह्यासाठी ८ हजार रोटाव्हायरस लस प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 11:24 AM2019-07-10T11:24:43+5:302019-07-10T11:25:33+5:30
ग्रामीण भागातील २८ हजार ७५२ बालकांना लस देणार, लसीकरणाला लवकरच सुरूवात
आॅनलाइन लोकमत
धुळे : डायरियासाठी कारणीभूत ठरणाऱ्या रोटाव्हायरसला प्रतिबंध करणारी ‘रोटासील’ ही लस बालकांना मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या अनुषंगाने धुळे जिल्ह्यात दीड, अडीच व साडेतीन महिन्याच्या सुमारे २८ हजार ७५२ बालकांना ही लस देण्यात येणार असून, आतापर्यंत ८ हजार रोटाव्हायरस लस उपलब्ध झाल्याचे आरोग्य विभागातून सांगण्यात आले.
डायरियामुळे १ ते ५ या वयोगटातील बालकांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याचे निष्पन्न झालेले आहे. या आजारामध्ये अंगातील पाण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होऊन, बालकाला अशक्तपणा येत असतो. वय लहान असल्याने, तोंडाद्वारे, फारसे काही घेतले जात नाही. परिणामी त्याला रूग्णालयात दाखल करावे लागते. एकीकडे याचा खर्च जास्त येत असतांना दुसरीकडे हे बालक कुपोषित राहण्याची शक्यता असते.
यावर उपाय म्हणून ज्यामुळे डायरिया होतो, त्या रोटोव्हायरस या व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी ही लस देण्यात येणार आहे. पावडरपासून तयार करण्यात येणारी ही लस इंजेक्शनच्या माध्यमातून दिली जाणार आहे. धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात २८ हजार ७५२ व संपूर्ण जिल्हा मिळून जवळपास ४२ हजार बालकांना ह लस देण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील दीड, अडीच व साडेतीन महिन्यांच्या बालकांना ही लस देण्यात येईल. वर्षभरात ही लस आरोग्य विभागातील परिचारिकांमार्फत बालकांना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
येत्या काही दिवसांपासून बालकांना लसीकरणाची मोहीम सुरू होईल. जिल्ह्यासाठी आतापर्यंत ८ हजार लस प्राप्त झालेली आहे.
लसीकरण सुरू झाल्यानंतर टप्या-टप्याने जिल्ह्यासाठी लस उपलब्ध होणार असल्याचे जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.