मुस्लीम बांधवांकडून पालखीचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 10:06 PM2019-09-08T22:06:54+5:302019-09-08T22:07:10+5:30
जातीय सलोख्याचा संदेश : पिंपळनेर येथे सद्गुरु श्री खंडोजी महाराज पालखी सोहळा उत्साहात, देखाव्यांनी वेधले लक्ष
पिंपळनेर : सद्गुरु श्री खंडोजी महाराज यांची १९१ वी पुण्यतिथी व नामसप्ताह महोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या पालखीचे जामा मशिद येथे मुस्लीम बांधवांनी स्वागत केले. पालखी सोहळ्यात पायदळी सोंगासह वहन देखाव्याचा भाविकांनी आनंद घेतला.
फुलांच्या वर्षावात स्वागत
सद्गुरु श्री खंडोजी महाराज यांची पुण्यतिथी व नामसप्ताह महोत्सवानिमित्त गेल्या सात दिवसांपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम मंदिरात सुरु होते. ७ रोजी पहाटे काकड आरती झाली. रात्री ११ वाजता पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला.
स्थानिक नागरिकांनी मठाधिपती योगेश्वर महाराज देशपांडे व परिवाराचे चौका-चौकात फुलांचा वर्षाव करीत स्वागत केले. मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या.
जयघोषाने नगरी दुमदुमली
या नामसप्ताह महोत्सवानिमित्त गेल्या सात दिवसापासून सर्वत्र भक्तीमय वातावरण झालेले होते. भजनी मंडळांनी पालखी सोहळ्यात शंख टाळ-मृदुंगाचा गजर करीत आनंद द्विगुणित केला. यावेळी खंडोजी महाराजांच्या जयघोषाने पिंपळनेर नगरी अक्षरश: दुमदुमली होती. भाविकांनी पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
माळी गल्लीत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले. त्यानंतर खोलगल्ली मार्गे पालखी बाजारपेठेत आली.
जामा मशिदजवळ मुस्लिम बांधवातर्फे पालखीचे स्वागत करण्यात आले. जहागिरदार परिवाराचे जहूर जहागिरदार यांच्याहस्ते मठाधिपती योगेश्वर महाराज देशपांडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गळाभेट घेण्यात आली.
यावेळी मुस्लिम बांधवांनी पालखीचे पूजन करुन पालखी खांद्यावर घेत जातीय सलोख्याचा संदेश दिला. हा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात येथे गर्दी केली होती.
याप्रसंगी लियाकत सैय्यद, जहूर जहागीरदार, जुबेर जहागीरदार, आर.के. अल्ताफ, डॉ.जितेश चौरे, जाकीर शेख, नौशाद सैय्यद, डॉ.मिलिंद कोतकर, डॉ.कैलास पगारे, डॉ.दत्तात्रय दळवेलकर, आसिफ शेख, शब्बीर शेख, ग्रामविस्तार अधिकारी डी.डी. चौरे, मुस्ताक शेख, समीर शहा, महेमूद सैय्यद, नानू पगारे, पीएसआय लोकेश पवार, पीएसआय भानुदास नºहे, अबरार शेख, हाजी जावेद, शकील शेख, गोलू शेख, मुन्वर कुरेशी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जैन समाज व जिव्हाळा ज्येष्ठ नागरिक महिला संघातर्फे पालखी व मठाधिपती यांचे स्वागत करण्यात आले. यात्रेत नागरिकांनी मोठी प्रमाणात गर्दी केली होती. ठिकठिकाणी मठाधिपती योगेश्वर महाराज देशपांडे यांचे औंक्षण करुन स्वागत करण्यात आले.
रात्रभर पालखी सोहळा
शनिवारी रात्री सुरु झालेला पालखी सोहळा रात्रभर सुरु होता. पालखी रविवारी सकाळी आठ वाजता श्री विठ्ठल मंदिरात पोहोचली. यावेळी मंदिरात टाळ, मृदुंगाच्या गजरात आरती करण्यात आली. या संपूर्ण उत्सवात पिंपळनेर नगरी खंडोजी महाराजांच्या जय जयघोषाने अक्षरश: दुमदुमली होती.
पोलीस व वीज कर्मचारी सज्ज
यात्रा उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहायक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. यात्रेत वीज जाऊ नये, तसेच गोंधळ होऊ नये यासाठी वीज महावितरण कंपनीच्या कर्मचाºयांचा फौजफाटा व अधिकारी तळ ठोकून होते. एकूणच देखणा व शिस्तबद्ध सोहळा पार पडला.