शास्ती माफी योजनेत ५ कोटी रुपयांची वसुली; सहा हजार नागरिकांनी भरला थकीत मालमत्ता कर
By भुषण चिंचोरे | Published: March 1, 2023 05:08 PM2023-03-01T17:08:00+5:302023-03-01T17:08:17+5:30
महानगरपालिकेने जाहीर केलेल्या शंभर टक्के शास्ती माफी योजनेत ५ कोटी ७६ लाख २१ हजार २३० रुपयांची वसुली करण्यात आली.
धुळे :
महानगरपालिकेने जाहीर केलेल्या शंभर टक्के शास्ती माफी योजनेत ५ कोटी ७६ लाख २१ हजार २३० रुपयांची वसुली करण्यात आली. ६ हजार १४८ नागरिकांनी शास्ती माफी योजनेचा लाभ घेत थकीत मालमत्ता कराचा भरणा केला.
महानगरपालिकेने ६ फेब्रुवारीपासून शास्ती माफी योजना जाहीर केली होती. शंभर टक्के कर भरणाऱ्या नागरिकांचा दंड माफ करण्याचा निर्णय या योजनेत घेण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात ६ ते १२ फेब्रुवारीपर्यंत शास्ती माफीची योजना जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर २८ फेब्रुवारीपर्यंत योजनेला मुदतवाढ देण्यात आली होती. पहिल्या आठवड्यात चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार २८ फेब्रुवारीपर्यंत कर भरणाऱ्या नागरिकांना सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
साडेतीन कोटी रुपयांचा दंड माफ :
६ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत शहरातील ६ हजार १४८ नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा केला. मालमत्ताधारकांनी एकूण ५ कोटी ७६ लाख २१ हजार २३० रुपयांचा भरणा केला. कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना ३ कोटी ५८ लाख ५० हजार रुपयांचा दंड माफ करण्यात आला आहे.
एकूण थकबाकीत ५० टक्के दंड :
शहरातील मालमत्ताधारकांकडे एकूण ६६ कोटी रूपये थकबाकी आहे. त्यात तब्बल ३३ कोटी रूपये दंडाची रक्कम आहे. एप्रिल ते जानेवारी या दहा महिन्यांच्या कालावधीत महानगरपालिकेच्या वसुली पथकाने १८ कोटी रुपयांची वसुली केली तर फेब्रुवारी महिन्यात शास्ती माफी योजना जाहीर झाल्यानंतर ५ कोटी ७६ लाख रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे.
९३१ जणांनी भरली ऑनलाइन थकबाकी :
महानगरपालिकेच्या भरणा केंद्रावर गर्दी होत असल्याने प्रशासनाने ऑनलाइन पद्धतीनेही थकबाकी भरण्याची व्यवस्था केली होती. मात्र त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळाला, केवळ ९३१ नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने थकबाकी भरली. इतरांनी मात्र प्रत्यक्ष महानगरपालिकेच्या भरणा केंद्रावर जात थकबाकी भरणे पसंत केले.
हद्दवाढीच्या गावांमध्ये प्रतिसाद नाही :
हद्दवाढीच्या गावातील मालमत्ता कर चालू वर्षातील असल्याने त्यांना शास्तीमाफी योजनेचा लाभ देण्यात आलेला नव्हता. महानगरपालिकेने आकारलेल्या करांना हद्दवाढीच्या गावातील नागरिकांनी विरोध केला आहे. वसुली पथकाने तगादा लावला असला तरी ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.