काश्मिरमधील हिंदूचे पुनर्वसन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 10:36 PM2020-01-11T22:36:37+5:302020-01-11T22:36:57+5:30
सुनील घनवट : प्रांतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनात प्रतिपादन, आज समारोप
धुळे : १९ जानेवारी १९८९ या दिवशी काश्मिरमधून लाखों हिंदूचा वंशविच्छेद करण्यात आला़ या घटनेस १९ जानेवारीला २० वर्ष पूर्ण होत आहेत़ मात्र, अजुनही तेथील विस्थापित हिंदूचे पुनर्वसन झालेले नाही़ विस्थापित हिंदूंचे सन्मानाने पुनर्वसन करावे, असे प्रतिपादन हिंदू जनजागरण समितीचे छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्याचे संघटक सुनील घनवट यांनी केले़
धुळ्यातील मालेगाव रोडवर दोन दिवसीय प्रांतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनास शनिवारी प्रारंभ झाला़ त्यावेळी राज्य समन्वयक घनवट बोलत होते़ यावेळी किर्तनकार योगी दत्तनाथ महाराज, सनातन संस्थेचे सदगुरु नंदकुमार जाधव, धुळ्यातील भोलेबाबा दरबारचे परमपूज्य वाल्मिक दादा उपस्थित होते़
घनवट म्हणाले, बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूचा प्रथम विचार होत नाही़ गोरक्षकांना तुरुंगवास आणि गोहत्या करणारे मोकाट, अशी स्थिती आहे़ जेएनयू, जमिया-मिलीया, अलिगढ विद्यापिठात देशविरोधी घोषणा दिल्या जात आहेत़ त्यास अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हटले जाते़ ही परिस्थिती पालटण्यासाठी हिंदू राष्ट्र स्थापनेची आवश्यकता आहे़
सदगुरु नंदकुमार जाधव म्हणाले, सनातनच्या प्रसार कार्याला संत आणि देवाचे आशिर्वाद आहेत़ सनातनसह अन्य हिंदुत्वासाठी संघटना वेगवेगळ्या प्रकारे हिंदुत्वाचे कार्य करीत आहेत़ कोणी धर्मप्रसार, गो-हत्या, लव्ह जिहाद वा अन्य मार्गाने धर्मकार्य करीत आहेत़ यासाठी इश्वरीय पाठबळ मिळाल्यास आपला मार्ग सुकर होणार आहे़ ज्याप्रमाणे प्रभु रामचंद्र यांना भगवान शंकराचा, पांडवांना श्री कृष्णाचा तर छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी माता, रामदास स्वामी, तुकाराम महाराज यांचे आशिर्वाद मिळाले, त्याप्रमाणे या धर्म-अधर्मच्या लढ्यात आपणही नामजप, प्रार्थना केली तर आपणासही हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी आवश्यक अध्यात्मिक बळ मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले़
योगी दत्तनाथ महाराज म्हणाले, पाश्चात्य नववर्षाचे स्वागत करणे, गुढीपाडव्याचा खोटा इतिहास सांगून हिंदूना धर्मपरंपरेपासून दूर करण्याचे षडयंत्र काही पुरोगाम्यांकडून राबविले जात आहे़ यामुळे हिंदूनी धर्मपरंपरांचा इतिहास जाणून धर्मग्रंथांचा अभ्यास करुन धर्माचरण करण्याची आवश्यकता आहे़
दुपारच्या सत्रात आगामी काळात आपापल्या भागातील नियोजनाविषयी सर्वांनी गट चर्चेत सहभाग घेतला़ हिंदू जनजागृती समितीचे प्रेरणास्थान डॉ़ जयंत आठवले यांनी पाठविलेल्या संदेशाचे वाचन वैभव आफळे यांनी केले़ अधिवेशनाचा उद्देश रागेश्री देशपांडे यांनी सांगितला़ सुत्रसंचालन प्रतिक्षा कोरगावकर यांनी केले़ बहुसंख्य उपस्थित होते़