नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 10:08 PM2020-01-02T22:08:31+5:302020-01-02T22:09:02+5:30
भाजप विरूद्ध महाआघाडीत चुरस : अपक्षांची भूमिका महत्वाची ठरणार, काही गटांमध्ये दुहेरी-तिहेरी लढत
देवेंद्र पाठक।
धुळे : शिंदखेडा तालुक्यात भाजप विरूद्ध महाआघाडी असाच सामना रंगणार आहे. जिल्ह्यात एकमेव शिंदखेडा तालुक्यातच गट व गणातील एकही जागा बिनविरोध झालेली नाही. त्यामुळे १० गटात व २० गणांमध्ये चुरशीच्या लढती होण्याचे संकेत आहेत. यात नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार असून, यात कोण बाजी मारते याकडे लक्ष लागलेले आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने ‘लोकमत’ प्रतिनिधीने शिंदखेडा तालुक्याचा दौरा केल्यानंतर वरील चित्र दिसून आले.
तालुक्यात भाजपने १० गटात आणि २० गणात उमेदवार उभे केले आहेत़ तर १० गटापैकी काँग्रेसने चार गटात, राष्ट्रवादी काँग्रेसने तीन गटात, शिवसेनेने तीन गटात असे महाआघाडीतर्फे उमेदवार देण्यात आलेले आहेत़ रासपने एका गटात तर अपक्ष चार असे एकूण २५ उमेदवार रिंगणात आहेत़ २० गणासाठी ६३ उमेदवार रिंगणात असून यात ४२ उमेदवार विविध पक्षाच्या तिकीटावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत़ यात २१ अपक्ष उमेदवार आपले नशीब अजमावित आहेत.
वर्शी गटात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांच्या पत्नी हेमांगी सनेर आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी ठेकेदार डी़ आऱ पाटील यांच्या पत्नी ज्योती यांच्यात लढत आहे़ या गटातील पाटण गणात काँग्रेसचे माजी सरपंच विशाल पवार आणि भाजपत नुकतेच दाखल झालेले पंचायत समितीचे माजी सभापती प्रा़ सुरेश देसले यांच्यात लढत आहे़ खलाणे गटात काँग्रेसकडून शरद भामरे हे निवडणूक लढवित आहेत. काँग्रेसकडून किशोर पाटील हे देखील इच्छूक होते़ पण, ऐनवेळी त्यांना उमेदवारी न दिल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत बंडखोरी केली़ भाजपने युवराज कदम यांना उमेदवारी दिल्याने आता त्यांच्यात लढत होईल़ वालखेडा गणात जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश पाटील काँग्रेसकडून उमेदवारी करीत आहेत़ त्यांच्या विरोधात भाजपकडून प्रविण मोरे आणि अपक्ष अनिल पाटील हे उमेदवारी करीत आहेत़ अनिल पाटील हे बंडखोर किशोर पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात़ परिणामी प्रकाश पाटील यांच्यापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे़ विखरण गटाकडे तालुक्याचे नाहीतर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे़ याठिकाणी कामराज निकम यांच्या पत्नी कुसुमबाई आणि त्यांच्या विरोधात विरदेल गटातील नेवाडे येथील माजी आमदार रामकृष्ण पाटील यांच्या पत्नी इंदिराबाई या निवडणूक रिंगणात आहेत़ या दोघांमध्ये आता सरळ लढत होणार आहे़ मेथी गटातून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे यांनी भाजपकडून उमेदवारी दाखल केली आहे़ त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून कर्ले येथील नारायण चव्हाण यांना तर अपक्ष म्हणून सुराय येथील जितेंद्रसिंग राजपूत हे उमेदवारी करीत आहेत़ या मतदार संघात राजपूत मतदान संख्या बऱ्यापैकी असल्यामुळे मतदार कोणाच्या पारड्यात मतांचे दान टाकणार? यावरुन त्यांचा विजय मानला जात आहे़
नरडाण्यात तिरंगी लढत
नरडाणा गटात भाजपच्या संजिवनी सिसोदे आणि त्यांच्या विरोधात बंडखोरी करुन दामिनी चौधरी (अपक्ष) निवडणूक रिंगणात आहेत़ तर, शिवसेनेकडून ज्योती पाटील या उमेदवारी करीत असल्याने येथे तिरंगी लढत आहेत़ नरडाणे गणात राष्ट्रवादीकडून सत्यजित सिसोदे, भाजपकडून राजेश पाटील तर अपक्ष म्हणून सिमाबाई अनिल सिसोदे हे उभे असल्याने तिरंगी लढत रंगणार आहे़
मालपूरमध्ये निवडणूक रंगणार
या गटात पंचायत समितीचे सदस्य सतिष पाटील यांनी त्यांची पत्नी सुजाता हिला भाजपकडून उमेदवारी मिळवून दिली़ काँग्रेसकडून हेमराज पाटील यांच्या पत्नी चंद्रकला यांना उमेदवारी मिळाल्याने थेट दुरंगी लढत रंगणार आहे़ मालपूर गणात भाजपकडून जिल्हा परिषदेच्या माजी सभापती पुष्पा रावल, काँग्रेसकडून प्रमिला पाटील आणि अपक्ष कल्पना इंदवे हे उमेदवारी करीत आहेत़
चिमठाण्यात एकाच समाजाचे तिघे
चिमठाणे गटात पोलीस विभागातील सेवानिवृत्त अधिकारी विरेंद्रसिंग गिरासे यांना भाजपकडून उमेदवारी दिली. तर भरत पारसिंग गिरासे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे़ रासपकडून जितेंद्रसिंग गिरासे हे निवडणूक रिंगणात आहेत. याच गटात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संगिता देसले यांचे पती राजेंद्र देसले यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती़ मात्र, ऐनवेळी त्यांनी माघार घेतल्याने एकाच समाजाचे तीन उमेदवार समोर आलेले आहेत़
विरदेलमध्ये आमने-सामने लढत
विरदेल गटात भडणे येथील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धनंजय मंगळे यांच्या पत्नी सत्यभामा मंगळे यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली़ तर काँग्रेसकडून गिता वेताळे आहेत़ तर अपक्ष म्हणून मालूबाई मगरे उमेदवारी करीत आहेत़ काँग्रेस आणि भाजप यांच्यातच खरी चूरस रंगणार आहे़
धमाण्यातही चुरस रंगणार
शिवसेनेकडून शानाभाऊ सोनवणे यांची पत्नी सुनीता आणि भाजपकडून शोभाबाई ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत़ परिणामी दुरंगी लढत पाहावयास मिळणार आहे़
होळ गणात माघार नाहीच
नरडाणा गटातील होळ गणात एकाही उमेदवाराने उमेदवारी मागे घेतलेली नाही़ परिणामी तीन पक्ष आणि तीन अपक्ष असे सहा उमेदवार एकमेकांच्या विरोधात आपले नशीब आजमावीत आहे़ याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे़
वर्शीकडे जिल्ह्याचे लक्ष
श्यामकांत सनेर यांचा गट विरदेल आहे़ मात्र, त्यांनी आपल्या पत्नीला वर्शी गटातून उभे केले आहे़ त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपाच्या उमेदवार ज्योती बोरसे या असल्यामुळे लढत आमने-सामने आहे़ यात कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे़
नावांचा असाही सारखेपणा
बेटावद गटात सपना ललित वारुडे आणि त्यांच्या विरोधात सपना नथ्थू वारुडे एकमेकांसमोर उभे राहिलेले आहेत़ दोघांचे कूळ, नाव आणि गाव एकच असल्याने या नावांची चर्चा गावात सुरु आहे़ नावांचा सारखेपणा असाही समोर आला आहे़
दुरंगी -तिरंगी होणार लढत
जिल्ह्यात धमाणे, वर्शी, बेटावद, विखरण आणि मालपूर गटात दुरंगी लढत होणार आहे़ तर, विरदेल, नरडाणा, मेथी, चिमठाणे आणि खलाणे या पाच गटात मात्र तिरंगी अशी लढत रंगणार आहे़ दिग्गज उमेदवार आता आमने-सामने उभे आहेत़
खलाण्यात चुरस
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शरद पंडीत भामरे यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली़ तर, किशोर पाटील यांना तिकीट नाकारल्याने शेवटी त्यांना अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची वेळ आल्याने चुरस आहे़