धुळे जिल्हा ग्रंथालय इमारतीसाठीच्या जागेचे आरक्षण बदलाकडे महापालिकेचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 05:01 PM2017-12-28T17:01:30+5:302017-12-28T17:02:34+5:30
मनपा : नगररचनाकार, ओव्हरसियरला निलंबनाची नोटीस
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील पांझरा चौपाटीलगत शासकीय ग्रंथालयाच्या इमारतीचे उद्घाटन नुकतेच थाटात पार पडले़ मात्र सदर जागेवर असलेले उद्यानाचे आरक्षण अद्याप बदलण्यात आलेले नाही़ याप्रकरणी हलगर्जीपणाचा ठपका ठेवत मनपा आयुक्तांनी नगररचनाकार प्रदीप चव्हाण व ओव्हरसिअर प्रकाश सोनवणे यांना निलंबनाची नोटीस बजाविली आहे़
शहरातील पांझरा चौपाटीलगत असलेल्या मौजे देवपूर गट क्रमांक १३ पैकी सि़सक़्रमांक ४७७९/१ क पैकी २० गुंठे जागा शासकीय ग्रंथालय इमारतीसाठी प्रस्तावित करण्यात आली असल्याने या जागेवर असलेले उद्यानाचे आरक्षण बदलण्यात यावे, अशी मागणी जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी मनपाकडे केली होती़ त्यानुसार मनपा नगररचना विभागाने आयुक्तांकडे कार्यालयीन प्रस्ताव सादर केला असता आयुक्तांनी १८ आॅगस्टला हा विषय महासभेत ठेवण्याची शिफारस केली होती़ सदर प्रस्ताव नगररचना विभागाने नगरसचिव कार्यालयास सादर केल्याबाबतचा पत्र व्यवहार उपलब्ध नस्तीवरून दिसून येत असला तरी नगरसचिव कार्यालयास संंबंधित प्रस्ताव अप्राप्त असल्याचे निदर्शनास आले आहे़
मनपाचे प्रभारी नगररचनाकार प्रदीप चव्हाण व ओव्हरसियर प्रकाश सोनवणे यांनी याप्रकरणी हलगर्जीपणा केला असून गांभिर्याने कार्यवाही न करता गैरवर्तवणूक केली आहे़ शिवाय वरिष्ठांच्या आदेशाचे पालन केलेले नाही़ सदर बाब अत्यंत गंभीर आहे़ त्यामुळे आपल्यावर शिस्तभंग विषयक कार्यवाही योजन्याकरिता आपल्याला तत्काळ निलंबित करून आपल्याविरूध्द नियम १२ अन्वये शास्ती करण्यासाठी एकत्रित चौकशी का करण्यात येऊ नये, याबाबत तीन दिवसांत आवश्यक कागदपत्रांसह खुलासा करावा अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस आयुक्त सुधाकर देशमुख यांनी प्रभारी नगररचनाकार प्रदीप चव्हाण व ओव्हरसियर प्रकाश सोनवणे यांना बजावली आहे़