धुळे जिल्ह्यातील फक्त तीन वाळू घाटांनाच प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 09:22 PM2017-12-22T21:22:27+5:302017-12-22T21:24:16+5:30
गौण खनिज विभाग : १६ वाळू घाटांसाठी पुन्हा नव्याने ‘ई-लिलाव’ प्रक्रिया
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यात उपलब्ध वाळूसाठ्यांचा उपसा ठेकेदारांमार्फत करण्यासाठी जिल्ह्यातील १९ वाळू घाटांसाठी नुकत्याच राबविण्यात आलेल्या ई- लिलाव प्रक्रियेला अल्प प्रतिसाद मिळाला. या प्रक्रियेंतर्गत केवळ शिरपूर तालुक्यातील दोन व शिंदखेडा तालुक्यातील एकाच वाळू घाटाला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील उर्वरित १६ वाळू घाटांसाठी पुन्हा नव्याने ‘ई- लिलाव’ प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला असून त्या दृष्टीने कार्यवाही सुरू केली आहे.
गेल्या वर्षी देण्यात आलेल्या वाळू ठेक्यांची मुदत ३० सप्टेंबर २०१७ रोजी संपली होती. त्या पार्श्वभूमीवर नव्याने वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया राबविण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो प्रस्ताव मंजुरीसाठी गौण खनिज विभागाने आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविला होता. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी जिल्ह्यातील १९ वाळू घाटांची अपसेट प्राईस मंजूर करून दिली होती. त्याची किंमत २१ कोटी ९६ लाख ६६ हजार ६८५ रुपये इतकी होती.
जिल्ह्यातील १६ वाळू घाटांसाठी नव्याने लिलाव प्रक्रिया
जिल्ह्यातील १६ वाळू घाटांसाठी नव्याने ई-लिलाव प्रक्रिया प्रशासनातर्फे राबविण्यात येत आहे. त्यासाठी २६ डिसेंबरपर्यंत आॅनलाइन नोंदणी करावी लागणार असून, २ जानेवारीला या वाळू घाटांसाठी आॅनलाइन लिलाव प्रक्रिया होणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.
यंदा वाळू घाटांची अपसेट प्राईस वाढली
गेल्या वर्षी २० वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया झाली होती. या वाळू घाटांसाठी १२ कोटी ५३ लाखांची अपसेट प्राईस निश्चित झाली होती. यंदा मात्र, १९ वाळू घाटांची अपसेट प्राईस ही २१ कोटी ९६ लाख ६६ हजार ६८५ रुपये निश्चित झाली आहे. गेल्या वर्षी २० वाळू घाटांसाठी लिलाव प्रक्रिया झाली होती. मात्र, त्यापैकी केवळ पाच वाळू घाटांच्या लिलावाला प्रतिसाद मिळाला होता. त्यात शिंदखेडा तालुक्यातील हिसपूर व वरली, शिरपूर तालुक्यातील उप्परपिंड, सावळदे व खर्दे खुर्द या गावांचा समावेश होता. वाळू घाटात पाणी असेल तर वाळू उपसा करू नये, असे हरित लवादाचे निर्देश आहेत. त्यामुळे यंदाही किती प्रतिसाद वाळू ठेकेदार देतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
यंदा शिरपूर तालुक्यात सर्वाधिक १० वाळू घाट आहेत, तर साक्री- २ व शिंदखेडा येथे ५ वाळू घाटांचा समावेश आहे.
१६ वाळू घाटांमध्ये उपलब्ध वाळूसाठा असा : (ब्रासमध्ये)
साक्री- दातर्ती १ (पांझरा नदी, ४२४० ब्रास वाळूसाठा), दातर्ती २ (पांझरा, ३१८०),
शिंदखेडा- कमखेडा (तापी, १७६७), आच्छी १ (तापी, २४०३), हिसपूर १ (तापी, ३५३४), हिसपूर २ (तापी, ३५३४), टाकरखेडा (तापी ३५३४), साहूर (तापी, २६५०),
शिरपूर : जापोरा (तापी, २६५०), पाथर्डे (तापी, ३५३४), खर्दे खुर्द (तापी, २२०८), सावळदे (तापी, ३५३४), कुरखळी -१ (तापी, ५३००), कुरखळी २ (तापी, ५३००), वाठोडे (तापी, २२०८), तºहाडी (तापी, ११४८)