स्थलांतरीत मजुरांची जबाबदारी तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 09:11 PM2020-04-11T21:11:27+5:302020-04-11T21:11:52+5:30
जिल्ह्यात २२ कॅम्प । तहसिलदारांचे नियंत्रण, आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण
धुळे : स्थलांतरी मजूर, निराधार व्यक्तींसाठी जिल्ह्यात प्रशासनाने २२ कॅम्प सज्ज केले आहेत़ प्रत्यक्षात त्यापैकी आठ कॅम्पमध्ये १४३ स्थलांतरीत मजुरांची अन्न निवाºयाची सोय केली आहे़ संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे़ त्यांच्यावर तहसिलदारांचे नियंत्रण आहे़
पोटाची खळगी भरण्यासाठी विविध महानगरांमध्ये गेलेल्या मात्र कोरोनाच्या संकटामुळे उपासमार होऊ नये म्हणून घर गाठण्याची आस असलेल्या १५६ स्थलांतरीत मजुरांना धुळे जिल्ह्यात स्थानबध्द करण्यात आले होते़ त्यात १३२ परप्रांतीय तर महाराष्ट्रातील २४ मजुरांचा समावेश आहे़ परप्रांतीय मजुरांमध्ये ९४ राजस्थानचे, ११ हरियाणाचे, १२ झारखंडचे तर १५ मजूर छत्तीसगडचे आहेत़ धुळे महानगरपालिकेने अग्रवाल भवनात ३३ मजूरांपैकी १३ तमाशा कलावंत मोहाडी येथील वसाहतीत परतल्याने आता २० मजूर आहेत़ नगाव येथील हॉटेल जम्मूचे कारागिर आणि वेटर असे ११ जण हॉटेलमध्येच थांबले आहेत़ धुळे ग्रामीणमध्ये पाडळदे, पुरमेपाडा, तरवाडे, मुकटी, नवलनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कॅम्प तयार केले आहेत़ परंतु याठिकाणी अजुनपर्यंत एकही मजुर नाही़ साक्री तालुक्यात एकूण ९२ स्थलांतरीत मजुर असून त्यापैकी १४ राजस्थानचे तर १२ झारखंडचे आहेत़ राज्यातील नऊ मजुरांपैकी सात अहमदनगरचे आणि दोन जळगाव जिल्ह्यातील आहेत़
तसेच हट्टी खु़ गावात भाडेतत्वाच्या इमारतीमध्ये १३, आमोदे येथे भाडेतत्वाच्या इमारतीत चार, छावडी येथे पाच तर दुसाणे येथे नऊ मजुरांची व्यवस्था केली आहे़ पिंपळनेर येथे वाणी मंगल कार्यालयात तयार केलेल्या निवाºयात ५७ स्थलांतरीत मजुर असून त्यापैकी १५ यवतमाळचे तर ४२ मजूर राजस्थानचे आहेत़
शिंदखेडा तालुक्यात दोन कॅम्पमध्ये एकूण ३१ मजूर आहेत़ त्यापैकी १५ छत्तीसगडचे तर १६ राजस्थानचे आहेत़
स्थलांतरीत मजुरांचा प्रवास थांबला
लॉकडाउननंतर मजुरांनी महानगरांमधून पायपीट करीत आपल्या गावाकडे प्रवास सुरू केला होता़ अशा मजुरांना प्रशासनाने जिल्ह्यात थांबवून त्यांच्यासाठी मदत शिबीरे सुरू केली़ शिबीरांमधील मजुरांना स्वयंसेवी संस्था आणि दानशून व्यक्तींकडून भोजन पुरविले जात आहे़ आरोग्य विभागामार्फत या मजुरांचे वेळोवेळी सर्वेक्षण केले जात असून त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आलेली नाहीत़