वैयक्तिक शौचालयांची जबाबदारी सरपंचांवर
By admin | Published: February 28, 2017 12:45 AM2017-02-28T00:45:11+5:302017-02-28T00:45:11+5:30
जिल्हा परिषद : सर्वाधिक साक्री तालुक्यात, तर शिरपुरात कमी कामांचा समावेश
धुळे : जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही स्वच्छतेबाबत जनजागृती करावी लागत असल्याचे दु:ख आहे़ ग्रामसेवकांप्रमाणे आता त्या त्या गावातील सरपंचांवरही वैयक्तिक शौचालयाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. स्वच्छता व वैयक्तिक शौचालयांचे काम समाधानकारक न झालेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवकांची लवकरच सुनावणी घेण्यात येईल, असे आदेश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिले होते़ त्यामुळे आता लवकरच सरपंचांची सुनावणी घेण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत़
दहितेंचा पुढाकार
गेल्या महिन्यात जिल्ह्यातील चारही तालुकानिहाय ग्रामसेवकांची सुनावणी घेण्यात आली़ वैयक्तिक शौचालयांसंदर्भात अतिशय कमी काम झालेल्या ग्रामसेवकांची खरडपट्टी निघाल्यानंतर आता सरपंचांकडे नजर वळविण्यात येणार आहे़ अध्यक्ष दहिते यांनी याकामी पुढाकार घेऊन लवकरच त्याबाबत बैठक घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत़
शौचालयासाठी पाण्याची गरज
बहुसंख्य ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्यामुळे पाणीटंचाईबाबत अधिकारिवर्ग किती दक्ष आहे, याबाबतही चाचपणी घेण्यात येणार आहे़ शौचालयासाठी पाणी गरजेचे असल्याने त्या दृष्टीने लक्ष दिले जात आहे़ कोणत्या प्रकारच्या उपाययोजना आखल्या जात आहेत, याचा धावता आढावा होणार आहे़
ज्या गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत असेल त्या ठिकाणी लक्ष देण्याच्या सूचना अधिकाºयांना देण्यात आलेल्या आहेत़
निधीबाबत पाठपुरावा
जिल्हा परिषदेला मिळणारा निधी हा जिल्हा नियोजन मंडळाकडून प्राप्त होत असतो़ त्या आनुषंगाने आजवर मिळालेला आणि प्राप्त होणाºया निधीबाबत लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले़ तसेच विविध योजनांचा आढावा घेत असताना तातडीने आपल्याकडील निधी खर्च करण्याच्या सूचनाही या वेळी विभागप्रमुखांना देण्यात आल्या़
त्यात वैयक्तिक शौचालयांवर सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे़
ग्रामस्थांना याकामी देण्यात येणाºया १२ हजारांच्या निधीचाही हिशेब लवकरच घेण्यात येणार आहे़ या सर्व कारवाईला येत्या आठवड्यात सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनातर्फे देण्यात आली.
लवकरच होणार सुनावणी
जिल्ह्यातील ग्रामीण भागात वैयक्तिक शौचालये किती प्रमाणात मार्गी लावले जात आहेत, त्यांचा वापर नियमित होतो का? याची चाचपणी सध्या सुरू झालेली आहे़
कमी काम झालेल्या ग्रामसेवकांनंतर आता सरपंचांकडे लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे़ त्यांचीही जबाबदारी गावात मोठी असल्याने जिल्हा परिषद अध्यक्षांकडून यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आलेला आहे़