सखींनी सांभाळली मतदान केंद्राची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 11:21 PM2019-04-29T23:21:01+5:302019-04-29T23:21:56+5:30
प्रेरणादायी : पाच रणरागिणींनी सांभाळला कारभार, स्वयंसेवकांनी महिला मतदारांचे केले स्वागत
धुळे : लैंगिक समानता आणि मतदार प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागा संबंधातील वचन बद्धतेचा भाग म्हणून लोकसभा निवडणुकीसाठी महिलांनी चालविलेले स्वतंत्र महिला मतदान केंद्र तयार केले होते. त्याला 'सखी मतदान केंद्र' असे नाव देण्यात आले होते. धुळे शहरातील उन्नती शाळेतील देवपूर पूर्वेकडील खोली क्रमांक १ मध्ये हे मतदानकेंद्र तयार करण्यात आले होते. या केंद्रावर पाच महिलांनी मतदान केंद्राची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली.
लालरंगाची मॅट, गुलाबी पडदे, रांगोळी आदींनी सजविलेले हे केंद्र मतदारांचे आकर्षण ठरले होते. उन्नती शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच सखी मतदारसंघाचा फलक लावण्यात आला होता़ या प्रवेशद्वारापासून ते मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी लाल रंगाची मॅट टाकण्यात आली होती. प्रवेशद्वाराजवळच तरूणी स्वयंसेवकांमार्फत मतदानासाठी येणाऱ्या महिलांचे स्वागत करण्यात आले होते. मतदान केंद्रही आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले होते. मतदान केंद्रात रंगीबेरंगी पतका लावण्यात आलेल्या होत्या. त्याचबरोबर मतदान कर्मचारी ज्या ठिकाणी बसतात त्या टेबलावरही गुलाबी रंगाचा कापड आंथरण्यात आलेला होता. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष मतदान करण्यात येत होते,त्यालाही सजविण्यात आले होते.
सायंकाळी सहा वाजता मतदानाची प्रक्रिया पूर्ण करीत मशीन सील करण्यात आले़
यासोबतच एक महिला पोलीस कर्मचाºयाची याठिकाणी नियुक्ती केली होती.
उन्नती शाळेतील ४३ क्रमांकाच्या या केंद्रांवर केंद्राध्यक्ष मालती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान अधिकारी ज्योती पाटील, रंजना साळुंखे, सरिता शिंपी व मदतनीस मनीषा वारूळे यांनी कामकाज पाहिले. शहरात असलेल्या एकमेव ‘सखी’ मतदान केंद्राची सर्वत्र चर्चा होती.