रोहिणी केटीवेअर कामास मुहूर्त मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:13 PM2019-02-23T12:13:33+5:302019-02-23T12:14:40+5:30
दशकापासून काम रखडले : निधीअभावी काम लालफितीत; पावसाळ्यापूर्व काम झाल्यास मिळेल दिलासा
निजामपूर : ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’च्या भरपूर घोषणा होतात. मात्र पाणी अडवण्याच्या योजनांसाठी निधीच्या अभावाचे कारण पुढे येणे अपेक्षित नसून आगामी पावसाळ्यापूर्वी तरी निजामपूर जैताणेच्या जलसिंचनास वरदान ठरेल असा व अनेक वर्षापूर्वी रोहिणी नदीच्या पुला खाली मंजूर झालेला केटी वेअर त्वरित बांधला जाणे अत्यंत आवश्यक झाले आहे. मात्र लालफितीत अडकलेला हा केटी वेअर बंधारा कधी बाहेर येणार? असा संतप्त सवाल जनतेतून होत आहे.
निजामपूर जैताणे येथे २००९ मध्ये रोहिणी नदीच्या पात्रात केटीवेअर बांधण्या संदर्भात सर्वेक्षण झाले होते. त्यावेळी जि.प. सदस्य चंदूलाल जाधव होते. साक्री तालुक्यासाठी विशेष पॅकेजची घोषणा झाली. त्यात जाधब यांनी आग्रही भूमिका मांडली होती.
या केटीवेअर बांधण्यासाठी एक कोटीचा निधी आवश्यक होता. मात्र निधीअभावी केटीवेअरचे काम लाल फितीत अडकले आणि त्या नंतर वारंवार वृत्तपत्रातून आवाज उठला.
पण त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. २०१८ च्या पावसाळ्यात केवळ एक दिवस व अर्धा तास जेमतेम पाऊस झाला आहे. या भागात भीषण दुष्काळ पडला आहे. नदीच्या उगमाकडे थोडा पाऊस झाला, त्यामुळे रोहिणी नदीस पाणी आले ते देखील वाहून गेले.
निजामपूर - जैताणे गावाला वळसा देत जाणाच्या रोहिणी नदीपात्रात पुलाखाली पूर्वेस केटीवेअरला जुलै २००९ मध्ये हिरवा कंदील मिळाला होता. तालुक्यासाठी विशेष पॅकेजची घोषणा झाली. त्यात या प्रकल्पासाठी आग्रही भूमिका राहिली. ११० मीटर लांब व सात मीटर उंचीचा हा कोल्हापूर टाईप बंधारा बांधायचे नियोजन होते. परिसरातील शेतीला जलसिंचनाचा लाभ होण्याचे व विहिरी, बोअरवेल यांना नवसंजीवनी मिळून दोन किलोमीटर पर्यंतचा परिसर सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ठ्य होते. तब्बल एक दशक उलटले पण केटीवेअर केवळ स्वप्नच राहिला आहे. पं.स. सदस्य वासुदेव बदामे यांनी देखील वारंवार पाठपुरावा केला पण निधीची अडसर पुढे आली. आता येथे भीषण पाणी टंचाई आहे. आगामी पावसाळ्या पूर्वी तरी हे ‘पाणी आडवा पाणी जिरवा’चे काम झाले तर पुढील वर्षी गुरे, मेंढ्या, बकऱ्यांना आणि जनतेस दिलासा मिळू शकेल. रोहिणी नदीतून पावसाळ्यात पाणी वाहून जाते. ते अडवले गेले तर पाणी साठा होऊ शकतो.