घरातच अध्यात्म व संगीताचा समृध्द वारसा संस्कार रूपाने मिळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:45 AM2019-07-16T11:45:20+5:302019-07-16T11:48:31+5:30
पंडीत शेखर रूद्र यांची कृतज्ञता : शास्त्रीय संगीताचा वारसा शिष्य म्हणून स्विकारून संगीताच्या ज्ञानदानाचा गुरूंचा मार्ग सांभाळण्याचा प्रयत्न *गुरु पौर्णिमा विशेष *
वसंत कुलकर्णी।
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : आषाढ पौर्णिमा हीच गुरु पौर्णिमा व्यास पौर्णिमा म्हणून आपण साजरी करतो आपल्या जीवनात गुरुचे महत्व अनन्यसाधारण आहे त्या गुरूंबद्दलची कृतज्ञतेचे महत्व अनेक संतांनी अधोरेखित केले आहे. आपल्या जीवनातील अंधकार दूर करून जीवनाला घडवण्याचे कार्य गुरु करत असतात. आपल्या आयुष्याला आकार देणा-या गुरूंचे स्मरण म्हणजे गुरुपौर्णिमा विश्वाचे सार म्हणजे गुरु असं महत्व अभंगामध्ये वर्णित आहे. आमच्या घरातच गुरूंची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. घराण्यातच संगीत आणि अध्यात्माचा वारसा संस्कार रूपाने बालपणा पासूनच मला लाभला आहे. आपल्याकडे जे काही ज्ञान म्हणून आहे ते समोरच्या शिष्याला देऊन टाकणारा गुरु असावा आणि सुदैवानं मला तशी गुरु परंपरा लाभल़ी़ माझे आजोबा श्री नारायण बुवा रुद्र ते वडील श्रीरामबुवा रुद्र, आई पुष्पाताई रुद्र, भाऊ महाराज, सुनीता ताई रुद्र- भालेराव, जयश्री ताई ,सुलभाताई माझी मोठी बहीण सुनीता ताई अगदी तिसºया चवथ्या इयत्तेत सांस्कृतिक कार्यक्रमात मला तबला, हार्मोनियम ची साथ द्यायला सोबत न्यायच्या तेव्हा पासून संगीताची आवड मनात रुंजी घालायला लागली. पुढे नवव्या वर्गात दिलीप कुलकर्णी सरांकडे हार्मोनियमचे शास्त्रशुद्ध शिक्षणाचे धडे घेतले. नंतर अशोक कुलकर्णी सरांकडे शिष्य म्हणून गायनाचे धडे सुरु झाले. गुरुजींनी भरभरून सर्व काही दिले अतिशय शिस्तीत आणि आदर युक्त धाकात संगीत अलंकार झालो आज सर नाहीत याची खंत आहेच़ गुरु शिष्य यातील आदर युक्त भीती आज नाही चांगला शिष्य घडवण्यातली आजची सर्वात मोठी खंत झाली आहे. पुढे १२ वर्ष विविध गुरूंकडे शास्त्रशुद्ध शिक्षणाचे धडे घेतले ज्यात पुण्याचे डॉ. दिवाण, पंडित स.भ. देशपांडे, कोल्हापूरच्या भारती वैशंपायन धुळ्याच्या मंगलाताई कुलकर्णी या सर्वांपासून संगीताचा समृध्द वारसा अनुभवायला मिळाला़ ज्यात जीवनातला सगळं अंधकार नष्ट करणारे गुरु असतात.कालांतराने संगीताचे शिक्षण घेत असताना पुढे संगीत विशारद, संगीत अलंकार, एम.ए. संगीत, नेट आणि गेल्या जानेवारी महिन्यात जालना येथे परळीकर गुरुजींच्या हस्ते शास्त्रीय संगीतातील सर्वोच्च पंडित पदवी प्रदान करण्यात आली, याचा आनंद आहे. संगीताचा मूळ गाभा शास्त्रीय संगीत आहे आणि या गाभ्याची सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे. विद्यार्थी हा सोने असतं तर गुरु हे त्याचा परिस स्पर्श.सुदैवाने मला गुरु रूपाने असे परिस्पर्श लाभले ज्या मुळे गेली अठ्ठावीस वर्ष गुरु रूपाने संगीत कलेचं ज्ञानदान करून कलेची सेवा करता करत आहे. डॉ.बाळासाहेब नाईक यांनी धुळ्यात शास्त्रीय संगीताचा पाया रुजवला त्यांच्या नंतर शुभांगी पाटणकर या पुण्यात गेल्या नंतर गेली १२ वर्ष आदर्श संगीत विद्यालयाच्या माध्यमातून संगीत शिकवतोय माज्या सोबत माझी शिष्या व पत्नी कीर्ती रुद्र, संजीव कुलकर्णी, अनुजा जोग, दिनेश रुद्र या कलेची शिकवण इतर विद्यार्थ्यां न पर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे.
संगीत विद्यालायत १७५ विद्यार्थी संगीत विशारद, ३ संगीत अलंकार ज्यात डॉ. अरुंधती गजरे भारतात दुसरा क्रमांक मिळवला, १८ विदयार्थी एम ए संगीत झाले याचे समाधान आहे़ सत्तावीस वर्षा पासून एक कृतज्ञ सोहळा गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निम्मिताने आयोजित करतो महाविद्यालयातून शिकून गेलेले शिष्य एकत्र येऊन जेव्हा कला सादर करतात त्यावेळी गुरूबद्दलची कृतज्ञता ते व्यक्त करतात. गुरु आशीर्वादच म्हणा की मला भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, पं.अजित कडकडे, पं़राजन साजन, पं.प्रभाकर करेकर यांच्यासारख्या महान कलावंतांच्या सोबत साथसंगत करण्याचा योग लाभला.