धुळे जिल्ह्यात नद्यांना अद्याप पूर कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 01:30 PM2019-08-05T13:30:45+5:302019-08-05T13:31:35+5:30
पालकमंत्र्यांनी घेतला स्थितीचा आढावा
धुळे : जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून त्यामुळे पूरस्थिती कायम आहे. यामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सविस्तर आढावा घेतला. सोमवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ११ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. त्यामुळे पांझरा, कान, जामखेली, बुराई या नदी-नाल्यांना पूर कायम असून खबरदारीचा उपाय म्हणून आज जिल्ह्यातील संपूर्ण शाळांना सुटी देण्यात आली आहे.
रविवारी दुपारनंतर अक्कलपाडा धरणातून नदीपात्रात सुरू झालेला विसर्ग कायम असून रात्री ४० हजार क्युसेस या प्रमाणात पाणी सोडण्यात येत होते. दुसऱ्या दिवशी सोमवारी विसर्ग कमी झाला असला तरी मोठा पूर सुरूच आहे. नागरिकांची पूर पाहण्यासाठी गर्दी होत असून तेथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. धुळे शहरात तीन लहान पूल पाण्याखाली गेले असून वाहतूक वळविण्यात आली आहे. दोन मोठ्या पुलांवरून सध्या वाहतूक सुरू आहे.
पांझरा नदीवरील अक्कलपाडा धरणातून प्रतिसेकंद १३ हजार ८०० क्युसेस, जामखेली धरणातून साडेचार हजार तर मालनगाव धरणातून २ हजार क्युसेस एवढा विसर्ग होत असून पूरस्थिती कायम आहे. पाऊस व पुरामुळे पिंपळनेर येथे नदीकाठावरील काही घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. साक्री तालुक्यातील काही गावांचा संपर्क अद्याप तुटलेलाच असून प्रशासनातर्फे तो प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र पूर कायम असल्याने अडचणी येत आहेत.