जलवाहिनीच्या कामांनी रस्त्याचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 01:13 PM2019-09-28T13:13:41+5:302019-09-28T13:14:04+5:30
तीनतेरा : प्रभागात भूमिगत गटारीसह जलवाहिनीच्या कामांना सुरूवात; नागरिकांचे हाल
धुळे : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या पाणी योजनेचे पाइप टाकण्यासाठी शहरातील सगळ्याच भागात रस्ते खोदले. आता भूमिगत गटारीसाठी रस्त्यांचे खोदकाम सुरू झाले आहे. त्यामुळे प्रभागातील रस्त्याची मोठ्या प्रमाणात हदणीय अवस्था झाली आहे़
शहरातील या भूमिगत गटार योजनेचे पाइप नदीच्या दोन्ही बाजूने टाकले जातील. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने योजनेसाठी शहराचे सर्वेक्षण केले. योजनेचे काम दोन भागात विभागण्यात आले आहे. त्यानुसार योजनेचा आराखडा तयार झाला. त्याला मंजुरी मिळाली. त्यामुळे प्रथम देवपूर भागापासून कामाला सुरुवात करण्यात आली होती़ त्यांनतर आता टप्या-टप्याने नगावबारी, पाडवी सोसायटी, मिल परिसर अशा विविध ठिकाणी भूमिगत गटारीची पाइपलाइन टाकण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. ओसवालनगर, फॉरेस्ट कॉलनीत चार किलोमीटरपर्यंत पाइप टाकण्यात आले आहे. या वेळी मुख्य वाहिनीला जोडणाऱ्या वाहिनी टाकण्याचे काम होत आहे.
सांडपाण्याची व्यवस्था
प्रत्येकाच्या घरातील सांडपाणी पाइपलाइनव्दारे जोडून ते एका चेंबरमध्ये आणून ते पुढे मुख्य वाहिनीला जोडण्यात येणार आहे. याप्रमाणे चार घरे मिळून एक चेंबर बांधण्यात येत आहे. त्यानंतर ते पुढे मेनहोलला जोडले जात आहे. याप्रमाणे ७२ मेन होल बांधून पूर्ण झाले आहे. योजनेच्या कामासाठी १२४ कोटी रुपयांची निविदा मंजूर करून काम करण्यात येत आहे.
शहरात भूमिगत गटार योजनेचे काम देवपूर भागापासून सुरु करण्यात आले आहे. यात देवपूरचा पहिला टप्पा आहे. देवपूर भागात १४१ किलोमीटरची एकूण गटारीसाठी पाइपलाइन टाकण्यात येणार आहे.