अवधान शिवारात २३ लाखांची रोकड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 10:52 PM2018-12-03T22:52:11+5:302018-12-03T22:52:47+5:30
एलसीबी : पहाटेची कारवाई, दोघे ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शहरानजिक अवधान शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारमधून नेली जाणारी सुमारे २३ लाख ५० हजाराची रोकड पकडली़ ही कारवाई सोमवारी पहाटेच्या सुमारास झाली असून याप्रकरणी दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे़
महानगर पालिकेची निवडणूक सुरु असताना शहराच्या नजिकच एवढी मोठी रक्कम सापडल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे़ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आपल्या सहकाºयांसमवेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई-आग्रा महामार्गावर शहरानजिक गस्तीवर होते़ अवधानकडून मुंबईकडे जाणाºया एमपी ०९ सीआर ६०९९ क्रमांकाची कार अवधान गावाच्या फाट्यावर अडविण्यात आली़ या वाहनाची तपासणी केली असता त्यात आसनाच्या खाली सुमारे २३ लाख ५० हजारांची रोकड आणि वाहनाची किंमत १० लाख असे एकूण ३३ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ त्यानंतर या कारमधील दोघांना ताब्यात घेण्यात आले़ यातील एक जण मुंबई येथील असून दुसरा इंदूर येथील रहिवासी आहे़ त्या दोघांची चौकशी सुरु आहे़
पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, संदिप थोरात, धनंजय मोरे, मायुस सोनवणे, गौतम सपकाळे, प्रविण पाटील, मयूर पाटील, तुषार पारधी, रविकुमार राठोड, विशाल पाटील, दीपक पाटील, केतन पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली़