लग्न जुळवून देण्यासाठी घेतले पावणेदोन लाख रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 09:58 PM2020-05-12T21:58:00+5:302020-05-12T22:01:39+5:30
फसवणूक : शिरपूर, मालेगाव, वाशिमच्या सहा जणांवर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे/दोंडाईचा : लग्नासाठी नवरी मुलगी मिळवून देण्याचे आमिष दाखवून दोंडाईचातील नागरिकाकडून पैसे लाटून फसवणूक केल्याप्रकरणी शिरपूरच्या दोन महिलांसह सहा जणांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़
दोंडाईचा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोंडाईचा येथे मालपूर रोडवर लक्ष्मी कॉलनीतील रहिवासी कैलास त्र्यंबक बडगुजर (५६) यांचा विश्वास संपादन करुन मुलाच्या लग्नासाठी नवरी मुलगी मिळवून देतो असे आमिष दाखवून त्यांच्याकडून एक लाख ७० हजार रुपये लाटले़ १७ डिसेंबर २०१९ पासून ते ११ मे २०२० पर्यंत हा प्रयत्न झाला़ सारंगखेडा ता़ शहादा येथे हा गुन्हा घडला़ परंतु आपल्याकडून केवळ पैसे लाटले जात आहेत़ लग्न जुळत नाही़ पैसे घेणारे त्यासाठी प्रयत्न करीत नाहीत हे लक्षात आल्यावर बडगुजर यांनी पोलिसांत फिर्याद दिली़
त्यानुसार कल्पनाबाई राजेंद्र पाटील, छायाबाई रमेश पाटील दोघी रा़ शिरपूर, अशोक मोरे टोपीवाला रा़ मराठी शाळेजवळ सोयगाव ता़ मालेगाव, अनिता पंडीत सावंत, शुभम पंडीत सावंत, मंदाबाई आकाश जाधव तिघे रा़ पिंपळगाव ता़ जि़ वाशिम यांच्याविरुध्द दोंडाईचा पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४२०, ४०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या संशयितांना अजुन पोलिसांनी अटक केलेली नाही़ पुढील तपास पोलीस नाईक व्ही़ बी़ पाटील करीत आहेत़