देवपुरात पैसे वाटप होत असल्याची अफवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 23:45 IST2018-12-07T23:44:34+5:302018-12-07T23:45:36+5:30
द्वेषातून गुन्ह्याचे कारस्थान

देवपुरात पैसे वाटप होत असल्याची अफवा
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : देवपुरातील विधी महाविद्यालय परिसरात भाजपचे प्रचारक पैसे वाटप करण्यासाठी थांबल्याच्या संशयावरुन काही कार्यकर्त्यांनी त्यांना खोलीत डांबल्याने तणाव निर्माण झाला. माहिती मिळताच आचारसंहिता पथकासह पोलीस घटनास्थळी आले़ त्यांनी खोलीची तपासणी केली असता तेथे काहीही आढळली नाही. ती अफवाच ठरली़ मात्र हे प्रकरण देवपूर पोलिसांपर्यंत पोहचले.
निवडणुकीच्या प्रचारासाठी काही मंडळी शहरात आली आहे. त्यांनी शहरातील हॉटेल्स, काही घरे भाड्याने घेतली आहेत़ भाजप कार्यकर्त्यांनी देवपूर विधी महाविद्यालय परिसरात त्याचपद्धतीने घर भाड्याने घेतले असून त्याठिकाणी काही प्रचारक थांबले आहेत़ ते मतदारांना पैसे वाटपासाठी आले असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसा असल्याचा संशय आनंदा पाटील आणि अॅड़विशाल साळवे यांना आला़ यामुळे त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी त्या प्रचारकांच्या घरात घुसून त्यांना जाब विचारला़ यानंतर त्यांना त्यांच्या खोलीत कोंडून पोलिसांसह आचारसंहिता पथकाला बोलावून घेतले़ त्यासह उपअधीक्षक सचिन हिरे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आदी घटनास्थळी आले़ त्यांनी खोलीसह साहित्याची तपासणी केली़ मात्र तेथे डेमो मशिनशिवाय काहीही मिळाले नाही. यानंतर हा विषय थेट देवपूर पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला. मात्र काही काळ तणावाची स्थिती होती़ अखेर ती अफवाच ठरली़
द्वेषातून गुन्ह्याचे कारस्थान
मी लोकसंग्रामतर्फे उमेदवारी करत असून मी वकील असल्याने अन्याय विरोधात लढणे माझा स्वभाव आहे. देवपूर पोलीस ठाण्यात माझ्या विरूद्ध राजकीय द्वेष भावनेतून गुन्हा दाखल केल्याचे अॅड.विशाल साळवे यांनी पत्रकाद्वारे कळविले.