पीक कर्जासाठी विशेष मोहिम राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 10:00 PM2020-07-29T22:00:16+5:302020-07-29T22:00:34+5:30
कृषी मंत्री : मका पिकाची पहाणी, महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन
धुळे : राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी धुळे जिल्ह्याच्या दौºयादरम्यान साक्री तालुक्यात विटाई येथे मका पिकाची पाहाणी केली तर लोणखेडी येथे आयोजित महिला शेती शाळेस मार्गदर्शन केले़
मंत्री दादा भुसे यांनी विटाई, ता. साक्री येथे धनराज गजमल खैरनार यांच्या शेताला भेट देवून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत मका पीक प्रात्यक्षिकाची पाहणी केली. त्यानंतर डाळिंब बागेची पाहणी करून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. यावेळी आमदार मंजुळा गावित, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे, तहसीलदार प्रवीण चव्हाणके, साक्रीचे तालुका कृषी अधिकारी सी. के. ठाकरे, पंचायत समितीचे सदस्य राजधर देसले, विटाईचे सरपंच भीमराव खैरनार, कासारेचे सरपंच विशाल देसले आदी उपस्थित होते. त्यानंतर बेहेड ता. साक्री शिवारात गवार आणि तूर पिकांचे आंतरपीक घेतलेल्या शेतकºयाच्या शेतात जावून त्यांच्याशी संवाद साधला. गवारची बाजारपेठ, उत्पन्न, लागवड याविषयी त्यांनी संवाद साधला. याशिवाय मंत्री भुसे यांनी नांदवण, ता. साक्री येथील दाळ मिलला भेट देवून पाहणी केली.
कृषी मंत्री दादा भुसे यांनी लोणखेडी ता. धुळे येथे पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) अंतर्गत सुरू असलेल्या शेतीशाळेस भेट देवून मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले, शेती शाळेत मिळालेले ज्ञान आपल्या परिसरातील अन्य महिला शेतकºयांपर्यंत पोहोचवा. त्यामुळे शेतीच्या उत्पादन खर्चात बचत होण्यास मदत होईल. महिला शेतकºयांना मंत्री भुसे, आमदार गावित, सामाजिक कार्यकर्ते हिलाल माळी यांच्या हस्ते शेतकरी कीटचे वितरण करण्यात आले. सीमा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मंडळ कृषी अधिकारी अमृत पवार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यानंतर मंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आढावा बैठक घेतली. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत धुळे जिल्ह्यातील ४० हजार ९६४ शेतकºयांना ३०७ कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे. त्या तुलनेत पीक कर्जाचे वितरण कमी आहे. त्यामुळे अग्रणी बँक, जिल्हा उपनिबंधक यांनी शेतकºयांना पीक कर्ज वितरणासाठी विशेष मोहीम राबवावी़ पीक कर्ज वितरणाचा दर तीन दिवसांनी आढावा घ्यावा, असे आदेश दादा भुसे यांनी जिल्हाधिकाºयांना दिले़
यावेळी आमदार मंजुळा गावित, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रामकृष्ण खलाणे, जिल्हाधिकारी संजय यादव, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मनोजकुमार दास, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी पी. एम. सोनवणे आदींसह विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.