संत सेनानगरात बंद घर चोरट्याने फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 10:05 PM2019-10-14T22:05:48+5:302019-10-14T22:06:10+5:30
साडेतीन लाखांचा ऐवज : पोलिसात गुन्हा नोंद
धुळे : देवपुरातील संत सेनानगरमध्ये राहणारे कुटुंब बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्याने घरातील किचनच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतून साडेतीन लाखांचा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली आहे़ याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ चोरीच्या या घटनेमुळे संत सेनानगरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़
देवपुरातील संत सेनानगरात राहणारे सागर निलेश बडगुजर (२४) या घरमालकाने देवपूर पोलीस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, बडगुजर यांच्या घरातील सर्व सदस्य नातलगांकडे वर्षश्राध्दाच्या कार्यक्रमासाठी शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे १० आॅक्टोबर रोजी गेले होते़ बंद घर असल्याची संधी साधून चोरट्याने घराच्या किचनच्या बाजुकडील दरवाजा तोडला़ घरात प्रवेश करुन घरातील संसारोपयोगी साहित्याची नासधूस केली़ कपाटातील सामान अस्ताव्यस्त करुन टाकला़ कपाटात ठेवण्यात आलेले १८१ ग्रॅम सोन्याचे दागिने, १३ भार चांदी, रोख ५ हजाराची रक्कम असा एकूण ३ लाख ४९ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे़
बडगुजर कुटुंब १२ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घरी आल्यानंतर त्यांना आपल्या घराचा दरवाजा उघडा दिसला़ आपल्या घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ही बाब देवपूर पोलिसांना कळविली़ घटनास्थळी पोलीस येऊन त्यांनी पाहणी केली आणि घटनेचा पंचनामा केला़ याप्रकरणी सागर बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ पोलीस उपनिरीक्षक लोकेश पवार घटनेचा तपास करीत आहेत़ घटनेची चर्चा परिसरात सुरु आहे़