साक्री तालुक्यात १४ गावांना पाण्याची समस्या भेडसावू लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 09:59 PM2020-05-05T21:59:03+5:302020-05-05T21:59:18+5:30
गत वर्षापेक्षा कमी गावांना टंचाई : विहीर अधिग्रहण व टँकरचे प्रस्ताव
लोकमत न्यूज नेटवर्क
साक्री : गेल्यावर्षी चांगला पावसाळा झाल्याने पाणी टंचाई असलेल्या गावांची संख्या यावर्षी कमी झाली असून यावर्षी साक्री तालुक्यात १४ गावांना पाणीटंचाईची समस्या भेडसावू लागली आहे.
या गावांना काही ठिकाणी विहिरी अधिग्रहीत तर काही ठिकाणी टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यानुसार जिल्हास्तरावर कार्यवाहीसाठी अहवाल पाठवण्यात आला आहे.
गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने बऱ्याच गावांना पाण्याचा बºयापैकी साठा आहे. त्यापैकी केवळ १४ गावांनाच यावर्षी पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यात आमखेल, शेंदवड पैकी मावजीपाडा, केवडीपाडा, कुडाशी पैकी अम्बापाडा, देवजीपाडा, कोरडे, वाकी पैकी चाफाबन, कालटेक पैकी पचाळे, चोरवड पैकी दसवेल पाडा, लगडवार पैकी नवापाडा, देवजीपाडा, शेंदवड, सालटेक, बोपखेल, दिवाळ्यामाळ, मळगाव आदी गावांना विहीर अधिग्रहीत करणे किंवा पाण्याचे टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाला प्राप्त झाले आहेत.
गेल्यावर्षी ६५ गावांना होती टंचाई
गेल्यावर्षी साक्री तालुक्यातील काही गावांना नोव्हेंबर पासूनच तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले होते. मे अखेरपर्यंत जवळपास ६५ गावांना तीव्र पाणीटंचाई होती. त्यानुसार प्रशासनाने या गावांना उपाय योजना सुरू केली होती.