किराणा, भाजीपाला विक्रीला बंदी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 10:55 PM2020-05-10T22:55:58+5:302020-05-10T22:58:12+5:30
१४ पर्यत लॉकडाऊन : आयुक्तांची माहिती
धुळे : शहरात सोमवारपासून तीन दिवस किराणा, भाजीपाला पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल, या नियमाचे उल्लघन करणाऱ्यांकडून २१ हजार रूपयांचा दंड वसुल केला जाईल अशी अफवा रविवारी सोशल मीडियावर पसरली होती़ मात्र असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याने ही केवळ अफवा असल्याची माहिती मनपा आयुक्त अजिज शेख यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना दिली़
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व संक्रमण रोखण्यासाठी मनपा हद्दीत ११ मे रोजीच्या १ वाजेपासून ते १४ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लागू केला आहे़ या कालावधीत प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रातील अधिकृत किराणा दुकाने, स्वस्त धान्य विक्रीची दुकाने, भाजीपाला, फळ विक्रीची दुकाने ही सकाळी ८ ते दुपारी २ या कालावधीत सुरु राहतील. दूध विक्रेत्यांसाठी सकाळी ६ ते रात्री ८, तर पेट्रोल पंपचालकांसाठी ही वेळ सकाळी ६ ते दुपारी २ पर्यत राहणार आहे़ रविवारी दुपारी शहरातील किराणा, भाजीपाला विक्री बंद होणार अशी अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरासह ग्रामीण भागात नागरिक संभ्रमात पडले होते़ तर व्यवसायिकांनी देखील २१ हजार रूपये दंड आकारला जाणार असल्याची भीती व्यक्त केली होती़