चक्क किराणा दुकानातून डिझेल, पेट्रोलसह गुटखा विक्री; व्हेरगाव फाट्यावर पोलिसांची कारवाई
By देवेंद्र पाठक | Published: December 29, 2023 05:19 PM2023-12-29T17:19:03+5:302023-12-29T17:19:58+5:30
१६ हजारांचा मुद्देमाल जप्त.
देवेंद्र पाठक, धुळे : किराणा दुकानांतून होणारी डिझेल आणि पेट्रोलची विक्री पोलिसांनी छापा टाकून पकडली. सोबत गुटखाही हस्तगत करण्यात आला. ही कारवाई साक्री तालुक्यातील व्हेरगाव फाट्यावरील तेजस किराणा दुकानात गुरुवारी घडली. याप्रकरणी संजय मुरलीधर येवले (वय ५०) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.
साक्री तालुक्यातील व्हेरगाव फाट्यावर बिनधास्तपणे खुल्या पद्धतीने डिझेल, पेट्रोल विक्री केली जात असल्याची चर्चा होती. त्यानुसार पोलिसांनी व्हेरगाव फाट्यावरील तेजस किराणा दुकानात गुरुवारी सकाळी पावणे बारा वाजता निजामपूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. त्यावेळेस डिझेल आणि पेट्रोल खुल्या बाजारात विक्री करताना आढळून आले. पोलिसांनी छापा टाकून मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी १० हजार १२३ रुपये किमतीचा विमल पान मसाला, गुटखा तसेच ४ हजार ६५० रुपये किमतीचे ५० लिटर डिझेल, १ हजार ६०० रुपये किमतीचे १५ लिटर पेट्रोल असा एकूण १६ हजार ३७३ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय आणखी काय बेकायदेशीर विक्री होत आहे का याचीदेखील तपासणी पोलिसांनी केली.
याप्रकरणी पोलिस कर्मचारी सुनील अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुकानदार संजय मुरलीधर येवले (वय ५०, रा. व्हेरगाव फाटा, ता. साक्री) याच्याविरोधात विविध कलमान्वये निजामपूर पोलिस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी ७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे करीत आहेत.