घरांवर खारी माती, कागद टाकण्याची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:34 AM2021-05-24T04:34:45+5:302021-05-24T04:34:45+5:30
कापडणे : या वर्षी वेळेवर मान्सूनचे आगमन होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने, कापडणे गावासह परिसरातील नागरिकांनी आपापल्या कच्च्या ...
कापडणे : या वर्षी वेळेवर मान्सूनचे आगमन होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने, कापडणे गावासह परिसरातील नागरिकांनी आपापल्या कच्च्या मातीच्या धाब्याची डागडुजी करून धाब्यावर प्लास्टीक कागद अंथरून नवीन खारी माती टाकून धाब्याची दुरुस्ती केली जात आहे.
पावसाळा वेळेवर सुरू होण्याच्या अपेक्षेने शेतकरी आपल्या शेतीची कामे उरकण्यासोबत कच्च्या मातीच्या धाब्यांवर प्लास्टीक कागद-खारी माती टाकून पावसाच्या पाण्याने धाब्याची गळती लागू नये, यासाठी प्रयत्नशील आहेत.
खारी मातीला प्लास्टीक कागद पर्याय
सात-आठ वर्षांपूर्वी प्रत्येकाच्या धाब्यावर खारी माती/चिवट माती लांब अंतरावरून बैलगाडी अथवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने मोठ्या कसरतीने आणावी लागत होती, परंतु वर्षानुवर्षे खारी मातीचे उत्खनन होत असल्याने आता चांगल्या दर्जाची, पाण्याची गळती रोखणारी खारी माती उपलब्ध होत नाही. याला पर्याय म्हणून प्लास्टीकचा कागद धाब्यावरती टाकला जात आहे. कमी खर्चात कमी श्रमात प्लास्टीकचा कागद टाकून पावसाच्या पाण्याची गळती थांबविली जाते. म्हणून काही जण खारी माती, तर काही जण प्लास्टीक कागद टाकतात, तर काही जण प्लास्टीक कागद टाकून त्यावरती नवीन खारी माती देखील टाकत असतात. मात्र, आता ग्रामीण भागातही काँक्रिटच्या घरांची संख्या वाढू लागली असून, मातीच्या घरांची संख्या कमी होऊ लागलेली आहे. ज्याची मातीची घरे आहेत, ते पावसाळ्यापासून बचावासाठी खारी माती टाकीत असतात.
३०० रुपयांत एक बैलगाडी खारी माती
गेल्या काही वर्षांपासून बहुतांश शेतकऱ्यांकडे आता बैलजोडी नसल्याने ट्रॅक्टरच्या साह्याने आता खारी माती आणली जात असते. मालदार शेतकऱ्यांच्या अतिमोठ्या घरांच्या धाब्यावर तीन हजार रुपये ट्रॉलीप्रमाणे खारी माती विकत घेतली जात आहे, तर लहान घरांचे घर मालक ट्रॅक्टरवाल्यांकडून तीनशे रुपये प्रतिबैलगाडी खारी माती विकत घेत आहेत. सध्या येथील ट्रॅक्टरधारकांना खारी माती आणण्यात रोजगार उपलब्ध होत आहे. खारी मातीसोबतच प्लास्टीकचा कागद पन्नास रुपये मीटरपासून तर १२० रुपये मीटरपर्यंत बाजारातून विकत घेतला जात आहे.