धुळे जिल्ह्यासाठी सात तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:56 AM2019-01-29T11:56:29+5:302019-01-29T11:58:22+5:30
८० लाखांचा निधी मंजूर, सात गावांचा पाणी प्रश्न सुटण्यास होणार मदत
आॅनलाइन लोकमत
धुळे : गेल्यावर्षी झालेल्या असमाधानकारक पावसामुळे जिल्ह्यात आतापासूनच अनेक गावांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे. दरम्यान पाणी टंचाई निवारणार्थ जिल्हा प्रशासनातर्फे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्यात ७ तात्पुरत्या पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी सुमारे ८० लाख २५ हजार रूपये मंजूर झालेले आहेत. या तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनांचे काम सुरू झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातून देण्यात आलेली आहे.
जिल्ह्यात भेडसावणारी पाणी टंचाई लक्षात घेता, सात तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनांना नुकतीच मंजूरी मिळालेली आहे. यात साक्री तालुक्यातील म्हसदी गावासाठी तात्पुरती पाणी पुरवठा योजना मंजूर झालेली असून, त्यासाठी ३५ लाख रूपये मंजूर झालेले आहेत.
जिल्ह्यात सर्वाधिक पाणी टंचाईची झळ शिंदखेडा तालुक्याला बसत असून, या तालुक्यात पाच तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळालेली आहे. त्यात रेवाडी (७ लाख), कर्ले (सहा लाख), मांडळ (सव्वा आठ लाख), चौगाव बुद्रुक व चौगाव खुर्द गावासाठी प्रत्येकी ३-३ लाखांचा निधी मंजूर झालेला आहे. तर धुळे तालुक्यातील बोरविहिर येथेही तात्पुरती पाणी पुरवठा योजना मंजूर झाली असून, त्यासाठी १८ लाखांचा निधी देण्यात आलेला आहे. या पाणी पुरवठा योजनांचे कामे सुरू झाले असल्याची माहिती देण्यात आली.
पाण्याची समस्या सुटेल
या तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनांमुळे वरील गावांचा पाणी प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यात ६३ विहिरी अधिग्रहित
ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासनातर्फे आतापर्यंत ६३ विहिरी अधिग्रहित केलेल्या आहेत. आॅक्टोबर महिन्यापासूनच टप्या-टप्याने ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. जून अखेरपर्यंत या अधिग्रहित केलेल्या विहिरींमधून पाणी उचलण्यात येणार आहे.
सर्वाधिक गावे शिंदखेडा
विहिर अधिग्रहित केलेल्या गावांमध्ये शिंदखेडा तालुक्यातील तब्बल ४३ गावांचा समावेश आहे. यात चुडाणे, कलवाडे, मालपूर, दरखेडा, पिंपरखेडा, विटाई, वारूळ, टेंभलाय, धावडे, जोगशेलू, झिरवे, भडणे, माळी, दत्ताणे, वाघाडी ब्रुद्रुक, वरूळ, घुसरे, डांगुणे, परसामळ, मांडळ, दरवाडे प्र.न., चौगाव बुद्रुक, सुलवाडे, अजंदे खुर्द, बाभुळदे, कामपूर, सोनशेलू, अंजनविहिरे येथे प्रत्येकी एक-एक विहिर अधिग्रहित करण्यात आलेली आहे. तर वर्षी, सुराय, खर्दे बुद्रुक, हातनूर, रामी, जातोडा, विखरण या गावांसाठी प्रत्येकी २-२ विहिरी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत. तर धुळे तालुक्यात नावरी, आर्णि, धमाणे, नंदाळे खुर्द, सोनगीर येथे प्रत्येकी एक-एक तर फागणेसाठी दोन विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. शिवाय शिरपूर तालुक्यासाठी पाच व साक्री तालुक्यातील दोन गावांसाठीही खाजगी विहिरी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत.
जिल्हयात ६३ गावांना विहिर अधिग्रहित