वाळू माफियांकडून तहसीलदारांना धक्काबुक्की, नरडाणा पोलिसात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल
By अतुल जोशी | Published: July 19, 2023 06:44 PM2023-07-19T18:44:26+5:302023-07-19T18:45:12+5:30
याप्रकरणी नरडाणा पोलिसात तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे : विना परवानगीने वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अडविण्याचा प्रयत्न केला असता, ट्रॅक्टर चालकासह त्याच्या सोबत असलेल्या इतरांनी तहसीलदारास धक्काबुक्की करून ट्रॅक्टर पळवून नेले. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास म्हळसर-पाष्टे रस्त्यावर घडली. याप्रकरणी नरडाणा पोलिसात तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिंदखेड्याचे तहसीलदार ज्ञानेश्वर पंडीत सपकाळे हे मंगळवारी सायंकाळी म्हळसर रस्त्यावरून जात होते. त्यांना एका ट्रॅक्टरमधून वाळू वाहतूक होत असल्याचे दिसून आले. त्यांनी ट्रॅक्टर अडवून त्यांच्याकडे वाळु वाहतुकीचा परवाना मागितला असता, संशयित आरोपींनी शासकीय कामात अडथळा आणित तहसीलदार सपकाळे यांच्यासह त्यांच्या वाहनावरील चालकास धक्काबुक्की केली. तसेच ट्रॅक्टर पळवून नेले. याप्रकरणी तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी नरडाणा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून राहूल कोळी (वय२८), मनोज जाधव (२९), तुषार कोळी (३१, तिन्ही रा. म्हळसर, ता. शिंदखेडा) यांच्याविरूद्ध गुन्हादाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ करीत आहे.