सतीदेवी यात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 11:51 AM2020-01-25T11:51:52+5:302020-01-25T11:52:37+5:30
बोरीस : भाविकांची मांदियाळी; लाखोंची उलाढाल; नवस फेडणाऱ्यांची गर्दी; चोरांनी केली हातसफाई
लोकमत न्यूज नेटवर्क
लामकानी : धुळे तालुक्यातील बोरसी येथील प्रसिद्ध सतीदेवी यात्रोत्सवाला गुरुवार २३ रोजी उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी नवस फेडण्यासाठी भाविकांची रिघ लागली होती. यात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लाखो रुपयांचे उलाढाल झाली. दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लागल्या होत्या. ही यात्रा १० ते १५ दिवस सुरू असते. पहिल्याच दिवशी ४० ते ५० हजार भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली.
खान्देशात बोरीस येथील सतीदेवी यात्रोत्सव प्रसिद्ध आहे. यात्रेला धुळे जिल्ह्यातूनच नव्हे तर जवळच्या नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यातूनही दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. यात्रोत्वात पहिल्याच दिवशी नवस फेडण्यासाठी मोठ्यासंख्येत भाविकांनी गर्दी केली होती. यात महिलांची संख्या जास्त प्रमाणात होती. दर्शनासाठी भाविकांना रांगेत सोडण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यात्रोत्सवा दरम्यान लामकानी व बोरीस परिसरातील शाळांना सुट्या देण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात यात्रेत महिलांसह विद्यार्थी व विद्यार्थिनीं यात्रोत्सवाची मजा घेतांना दिसून आले. यात्रोत्सवाच्या आदल्या दिवशी गावात विविध मार्गावरुन तगतरावची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती. याठिकाणी नियोजनाचा अभाव प्रकर्षाने जाणवला. त्यामुळे दुपारी बारा ते एक वाजेच्या सुमारास मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गर्दी झाल्याने भुरट्या चोरांनी याचा फायदा घेत काही भाविकांचे पैसे लंपास केले. त्यामुळे काही भाविक मंदिरात जाऊन दर्शन न घेता बाहेरुनच दर्शन घेऊन निघून जातांना दिसले. मंदिरात परिसरात मिठाईच्या दुकानांसह, खेळण्यांची, सौंदर्यप्रसाधने, कटलरी, भांड्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. तसेच पाळणे दाखल झाले आहेत. यात्रोत्सवात कुस्त्यांची दंगल दोन दिवस चालते. धुळे, नंदुरबार, साक्री, नवापूर, शिंदखेडा, जळगाव, मालेगाव येथून कुस्तीपटू येत असतात.