१९३० मध्ये झाला पहिला जंगल सत्याग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 10:49 PM2019-08-14T22:49:40+5:302019-08-14T22:50:04+5:30
दिवाळ्यामाळ परिसर
हर्षद गांधी ।
निजामपूर : धुळे जिल्ह्यात पहिला ऐतिहासिक जंगल सत्याग्रह साक्री तालुक्यातील माळमाथ्यावर दिवाळ्यामाळ येथे १७ आॅगस्ट १९३० रोजी झाला. फार मोठ्या संख्येत झालेला जनसहभाग ब्रिटिशांना विचार करावयास लावणारा ठरला. या जंगल सत्याग्रहा पाठोपाठ धुळे जिल्ह्यात लळींग, जयनगर, डांगुणे, कुडावद, धमनार, फत्तेपूर, आमोदे आदी ठिकाणी जंगल सत्याग्रहासाठीप्रेरणा मिळाली. त्या अनोख्या पर्वास ८९ वर्षे लोटलीत. दरवर्षी आॅगस्ट महिना येताच त्या ऐतिहासिक सत्याग्रहाच्या आठवणी ताज्या होतात.
पंडित नेहरुंच्या अध्यक्षतेखाली १९२९ मध्ये लाहोर अधिवेशनात सत्याग्रह व असहकाराचे युद्ध करण्याचे ठरले. त्यासाठी सर्व अधिकार महात्मा गांधी व काँग्रेस कमेटीला देण्यात आले. जंगल सत्याग्रह प्रचार कार्यात गुंतलेल्या काही कार्यकर्त्यांना अटक व शिक्षा झाली.
धुळे जिल्ह्यात पहिला सामुदायिक जंगल सत्याग्रह १७ आॅगस्ट १९३० रोजी साक्री तालुक्यातील दिवाळ्यामाळ येथे ठरला. निजामपूर, खुडाणे, डोमकाणी रस्त्याच्या दक्षिणेस २ कि.मी.अंतरावर घटबारीच्या माथ्यावर विस्तीर्ण पठारावर दिवाळ्यामाळचे बंदिस्त व राखीव जंगल होते. तेथील गवत कापून कायद्याचा भंग करण्याचे ठरले. तो दिवस गोकूळ अष्टमीचा होता. आत्माराम पुंडलिक कुलकर्णी, मा. चि. देवरे, यशवंत सखाराम देसले यांच्या नेतृत्वाखालीमालपूर, कासारे, धाडणे, छडवेल पखरूण,सामोडे, पिंपळनेर, निजामपूर, जैताणे, साक्री, डोमकाणी, खुडाणे, छडवेल-कोर्ड या गावांमधून २५ हजारावर सत्याग्रही, शेतकरी, महिला, मुले या आंदोलनात सहभागी झाली होती.पोलिसांची कडी तोडून आंदोलकांनी आत घुसून जंगलातील गवत कापून कायदे भंग केला होता.