सावरकरांचे विचार अधिकाधिक लोकापर्यंत पोहचविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 04:46 PM2019-01-31T16:46:31+5:302019-01-31T16:47:34+5:30
स्वागताध्यक्ष रवी बेलपाठक : धुळ्याला प्रथमच मिळाला स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन आयोजनाचा बहुमान
आॅनलाइन लोकमत
धुळे : प्रखर राष्टÑभक्ती, साहित्यिक,कवी असे अनेक पैलु स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या व्यक्तिमत्वाचे होते. त्यांच्या विचारांना, कार्याला उजाळा देऊन ते विचार अधिकाधिक लोकांपर्यंत विशेषत: तरुण पिढीपर्यंत पोहचविणे हा संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे. दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन आयोजनाचा बहुमान सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या धुळे शहराला मिळाला ही गौरवास्पद बाब असल्याचे मत संमेलनाचे स्वागताध्यक्ष रवी बेलपाठक यांनी सांगितले.
महाराष्टÑ राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, सावरकर दर्शन प्रतिष्ठान मुंबई व धुळे एज्युुकेशन सोसायटी धुळे यांच्या संयुक्तविद्यमाने धुळ्यात २ व ३ फेब्रुवारी १९ रोजी अखिल भारतीय स्वा. सावरकर संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापार्श्वभूमिवर संमेलनाचा उद्देश, वैशिष्ट्य आदी विषयांवर रवी बेलपाठक यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.
रवी बेलपाठक म्हणाले, सावरकरांचे विचार आजच्या तरुणपिढीपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. सावरकर समजले तर देशाचे निश्चितच कल्याण होईल. सावरकरांच्या विचारांचा प्रसार, प्रचार व्हावा या उद्देशानेच दरवर्षी हे साहित्य संमेलन होत असते. यापूर्वी मुंबई, पुणे, सोलापूर, रत्नागिरी, लातूर, अंदमान, मॉरिशस, नेपाळ आदी ठिकाणी हे साहित्य संमेलन झाले असून, यावर्षी हे साहित्य संमेलन आयोजनाचा बहुमान धुळ्याला पहिल्यांदा मिळाला आहे.
या साहित्य संमेलनात सावरकरांवर अभ्यास करणारी, बोलणारी मंडळी येतील. खान्देशातून जवळपास हजारजण तर खान्देश वगळता इतर ठिकाणाहून २५० ते ३०० जण संमेलनात सहभागी होतील. या साहित्य संमेलनात येणाºया प्रत्येकाला स्वा.सावरकरांचे चित्र देण्यात येईल.
सावरकरांच्या धुळ्यातील आठवणींना उजाळा
स्वातंत्र्यवीर सावरकर मार्च १९४० मध्ये धुळ्यात आले होते. त्या काळात त्यांनी शहरातील ज्या-ज्या ठिकाणांना भेट दिली, त्या ठिकाणचे तत्कालीन चित्र या साहित्य संमेलनाच्यास्थळी लावून सावरकरांच्या धुळ्यातील आठवणींना उजाळा देण्यात येणार आहे.
दर्शनीभागात
अंदमानाचे चित्र लावणार
या साहित्य संमेलनाच्या दर्शनी भागात अंदमान निकोबार येथील सेल्युलर जेलचे छायाचित्र लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संमेलन स्थळाला
पु.भा.भावे यांचे नाव
ज्या ठिकाणी हे साहित्य संमेलन होणार आहे, त्या स्थळाला मराठी साहित्यामधील प्रतिभासंपन्न लेखक पु.भा.भावे साहित्यनगरी असे नाव देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
ग्रंथप्रदर्शन भरविणार
या ठिकाणी सावरकरांवरील आधारित ग्रंथ प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे.
दोन दिवस विविध कार्यक्रम
या साहित्य संमेलना दरम्यान दोन दिवस परिसंवाद, भाषण, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमात सावरकारांवर आधारित काव्य, नाटिकांचे वाचन करण्यात येणार आहे.
१ रोजी मिरवणूक
या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमिवर १ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता महात्मा गांधी पुतळा ते स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्यापर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांसह अनेक नामवंत मंडळी सहभागी होणार आहे.
संमेलनाचा लाभ घ्यावा
सांस्कृतिक वारसा लाभलेल्या धुळे नगरीत स्वा.सावरकर साहित्य संमेलन होत असून, धुळे शहरवासियांनी या संमेलनाचा लाभ घ्यावा असे आवाहनही स्वागताध्यक्ष रवी बेलपाठक यांनी केला आहे.