‘तंत्रनिकेतन बचाओ’चा लढा होणार तीव्र!
By admin | Published: February 6, 2017 12:06 AM2017-02-06T00:06:10+5:302017-02-06T00:06:10+5:30
विद्यार्थी संघटना व लोकप्रतिनिधी : जनभावना तीव्र, प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा
धुळे : देवपूर येथील शासकीय तंत्रनिकेतन बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे ‘शासकीय तंत्रनिकेतन बचाओ’साठी लढा तीव्र करण्याचा निर्णय आता विविध विद्यार्थी संघटना आणि लोकप्रतिनिधींच्या वतीने घेण्यात आला आहे.
शासकीय तंत्रनिकेतन हा धुळ्याच्या अस्मितेचा प्रश्न बनला आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो विद्याथ्र्याच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने धुळे येथील तंत्रनिकेतनकडून अहवाल मागविल्यामुळे शासकीय स्तरावर तंत्रनिकेतन बंदच्या प्रक्रियेला वेग आला आहे. त्यामुळे विद्यार्थी संघटनांनी याविरोधात आंदोलन तीव्र करण्याची तयारी सुरू केली आहे. कोणत्याही परिस्थितीत तंत्रनिकेतन बंद न होऊ देण्याचा निर्धार विद्यार्थी संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे.
जनभावना तीव्र : प्रा.शरद पाटील
शासकीय तंत्रनिकेतनमध्ये जिल्ह्यातील मोठय़ा प्रमाणात सर्वसामान्य घरातील विद्यार्थी कमी फीमध्ये चांगले शिक्षण घेत आहेत. त्यामुळे तंत्रनिकेतन बंदच्या विरोधात जनभावना तीव्र आहे. यापूर्वी आंदोलन करून जनभावना शासनार्पयत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन शासनार्पयत भावना पोहविल्या आहेत, असे शिवसेनेचे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी सांगितले.
विद्यार्थी चळवळ उभारणार
युवा सेनेचे जिल्हाप्रमुख पंकज गोरे म्हणाले की, शासकीय तंत्रनिकेतन बंदचा निर्णय शासनाला मागे घेण्यासाठी भाग पाडले जाईल. यासाठी शहरात व जिल्ह्यात युवा सेनेच्या वतीने व्यापक विद्यार्थी चळवळ उभारण्यात येईल.
मनसे विद्यार्थी सेनेचे प्रसाद देशमुख म्हणाले की, शासकीय तंत्रनिकेतनचा प्रश्न वेळोवेळी शासनाकडे मांडला आहे. विद्याथ्र्याच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. आता तंत्रनिकेतन बंदच्या विरोधात ‘मनसे स्टाईल’ने आंदोलन करण्यात येईल.
शासकीय तंत्रनिकेतन बंदच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. यासाठी राज्यस्तरावर पूर्ण ताकदीनिशी पाठपुरावा करण्यात येईल. तंत्रनिकेतन बंदच्या विरोधात विद्याथ्र्यामध्ये तीव्र नाराजी आहे. याचा शासनाने प्रामुख्याने विचार करावा, असेही सांगण्यात आले.
57 वर्षाची परंपरा
शासकीय तंत्रनिकेतन जिल्ह्यातील खूप जुनी संस्था आहे. ही संस्था बंद करून विद्याथ्र्याचे नुकसान करू नये अशी आमची सुरुवातीपासूनची मागणी आहे, असे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष नितीन ठाकूर यांनी सांगितले.