शाळा सकाळची, वेळ मात्र गैर सोयीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 11:35 AM2019-03-06T11:35:13+5:302019-03-06T11:36:18+5:30

जिल्हा परिषद : शाळेचीवेळ सकाळी ११.३० पर्यंत करण्याच्या मागणीकडे शिक्षण विभागाने केले दुर्लक्ष

School morning, time is non-convenient | शाळा सकाळची, वेळ मात्र गैर सोयीची

शाळा सकाळची, वेळ मात्र गैर सोयीची

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात जि.प.च्या ११०३ शाळाशाळेची वेळ सकाळी ७ ते १२ केलीमात्र ही वेळ गैरसोयीची असल्याची तक्रार

आॅनलाइन लोकमत
धुळे : गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढू लागताच, जिल्हा परिषदेने प्राथमिक शाळांच्या वेळेतही बदल केला आहे. १ मार्चपासून शाळा सकाळी ७ ते दुपारी १२ यावेळेत भरत आहेत. मात्र शाळेच्या वेळेत झालेला बदल हा गैरसोयीचा असून, शाळेची वेळ सकाळी ७ ते ११.३० अशी करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केला आहे.
धुळे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ११०३ शाळा असून, यात पहिली ते चौथीपर्यंत जवळपास ८० हजारापेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असतात. जून ते फेबु्रवारीपर्यंत या शाळा सकाळी ११ ते सायंकाळी पाच या वेळेत भरत असतात.
मात्र जिल्ह्यात यावर्षी दुष्काळाची स्थिती आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. तसेच दिवसेंदिवस तापमानाही वाढू लागलेले आहे. उन्हामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत अनेक विद्यार्थी आजारी पडतात आदी गोष्टींचा विचार करून जिल्हा परिषद शिक्षण विभागाने १ मार्चपासून जिल्हा परिषदेच्या शाळांच्यावेळेत बदल केलेला आहे.शाळा सकाळच्या सत्रात भरू लागल्या आहेत. शाळेची वेळ सकाळी ७.२० ते ११.३० करावी अशी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून जि.प.ने ही वेळ सकाळी ७ ते दुपारी १२ अशी केलेली आहे. ही वेळ विद्यार्थ्यांसाठी गैरसोयीची ठरत असल्याचे काही शिक्षकांचे म्हणणे आहे.
अनेक शाळा टिनाच्या
जिल्हा परिषदेच्या शाळा पूर्वी कौलारू होत्या. मात्र या कौलारूंची जागा आता टिन (पत्र्यांनी) घेतलेली आहे. नव्या शाळा स्लॅबच्या असल्या तरी आजही ७० टक्के शाळा या पत्र्याच्या खोलीतच भरत असतात. सकाळी १० वाजेपासूनच पत्रे तापायला सुरूवात होत असते. त्यामुळे विद्यार्थी या वर्गात जास्तवेळ बसू शकत नाही, अशी स्थिती आहे. अनेक ठिकाणी वर्गखोल्या या हवेशीर नाहीत. जिल्हा परिषद शाळांमध्ये पंख्याची सुविधा नाही. अशा असह्य उकाड्यामध्ये बसणे विद्यार्थ्यांना अशक्य होत असते.
सद्यस्थितीत जिल्ह्यातील काही शाळांमध्ये पाणी टंचाई जाणवत असल्याने, विद्यार्थ्यांना घरूनच पाणी आणावे लागत असल्याचे चित्र आहे.
शिवाय जिल्हा परिषद शाळांमध्ये सकाळी १० ते १०.३० वाजेच्या सुमारास शालेय पोषण आहार दिला जातो. आहारानंतर विद्यार्थी अनेकदा शाळेत थांबत नाही, अशीही स्थिती आहे.
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा सकाळच्या सत्रात केल्या असल्या तरी दुपारी १२च्या सुमारास उन्हाची तीव्रता प्रचंड असते. उन्हाचा फटका बसून, विद्यार्थी आजारी पडला तर त्यास जबाबदार कोण असाही प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे या शाळांची वेळ अर्धातास अगोदर करणे गरजेचे आहे, असे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे.
सकाळी ११.३०पर्यंतची वेळ करावी
जिल्हा परिषद शाळांमध्ये दररोज सहा तासिका होत असतात. शाळेची वेळ सकाळी ७.२० ते ११.३० अशी केली तरी सहा तासिका होऊ शकतात, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शाळेचीवेळ सकाळी ११.३० पर्यंत करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

 

Web Title: School morning, time is non-convenient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.