शाळेत १०० टक्के उपस्थिती असलेल्या विद्यार्थिनींचा, शाळांचा होणार गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 12:02 PM2019-03-07T12:02:10+5:302019-03-08T11:37:29+5:30
बेटी बचाओ-बेटी पढाओ उपक्रमांतर्गत होणार कार्यक्रम
आॅनलाइन लोकमत
धुळे : बेटी बचाओ- बेटी पढाओ अभियानातर्गत शाळेत १०० टक्के उपस्थिती असलेल्या २० विद्यार्थिनी तसेच मुलींचे गळतीचे प्रमाण शुन्य टक्के असलेल्या शाळांचा गौरव करण्यात येणार आहे. याचबरोबर निबंध, रांगोळी, वत्कृत्व, एकांकिका, चित्रकला आदी स्पर्धेतील विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात येणार आहे.
बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय शैक्षणिक पुरस्कार सोहळा जागतिक महिला दिनी अर्थात ८ मार्च रोजी दुपारी १ वाजता नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे होणार आहे.
ग्रामीण भागात विद्यार्थिनींचे शाळा सोडण्याचे प्रमाण जास्त आहे. याला आळा बसावा तसेच मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने त्यांचा गौरव करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
यात इयत्ता पहिली ते नववी पर्यंत शाळेत १०० टक्के उपस्थिती असलेल्या जिल्ह्यातील २० विद्यार्थिनींचा गौरव करण्यात येणार आहे. यात जिल्हा परिषद व खाजगी शाळांमधील धुळे, साक्री,शिंदखेडा तालुक्यातील प्रत्येकी ४-४, महानगरपालिका शाळेतील चार, व माध्यमिक विभागातील ४ अशा एकूण २० विद्यार्थिनींना पारितोषिक देण्यात येणार आहे. दरम्यान १०० टक्के उपस्थितीमध्ये शिरपूर तालुक्यातील एकाही शाळेचा समावेश नाही.
त्याचबरोबर इयत्ता ६वीमध्ये १०० टक्के उपस्थिती असलेल्या १२ शाळेतील मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांचा गौरव करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात ७ वी ते ९वी पर्यंत मुलींच्या गळतीचे प्रमाण शुन्य असलेल्या नूतन विद्यालय वारूड, ता. शिंदखेडा, उर्दू हायस्कूल दोंडाईचा, ता. शिंदखेडा, व अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय कलमाडी,ता. शिंदखेडा या शाळांच्या मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांचा सत्कार करण्यात येणार आहे.
तसेच दहावीतून १२वीपर्यंत अखंड शिक्षण प्रवाहात असलेल्या जिल्ह्यातील दोन शाळांचा गौरव करण्यात येणार आहे.
याशिवाय मार्च २००८ मध्ये जिल्ह्यातून दहावीत प्रथम १० आलेल्या दहा विद्यार्थिनींनाही गौरविण्यात येणार आहे. यात आठ सर्वसाधारण तर दोन दिव्यांग विद्यार्थिनींचा समावेश आहे.
१२वीत विविध शाखेतून प्रथम आलेल्या चार विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात येईल. यात तीन सर्वसाधारण व एक दिव्यांग विद्यार्थिनींचा समावेश आहे.
याचवेळी मान्यवरांच्याहस्ते तालुका व जिल्हास्तरावर घेण्यात विविध स्पर्धांमधील जवळपास ७० विद्यार्थी-विद्यार्थिनींचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.