धुळे जिल्हयातील सात शाळांमध्ये विज्ञान केंद्र सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:11 PM2018-06-17T12:11:44+5:302018-06-17T12:11:44+5:30
विज्ञान शिक्षकांचे १८ रोजी एकदिवसीय प्रशिक्षण
आॅनलाइन लोकमत
धुळे :विद्यार्थ्यांमधील चौकसपणा व सृजनशील कला गुणांना वाव मिळावा, त्यांना विज्ञान, गणित या विषयांची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सात शाळांमध्ये नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारण्यात येणार आहे. याचा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे देण्यात आली.
विद्यार्थ्यांचा कल विज्ञानाकडे अधिक आहे. विज्ञानाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांनाही संधी मिळावी म्हणून राज्यातील गट/ शहर साधन केंद्रामार्फत स्वानिक स्वराज्य संस्थेच्या निवडक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारण्यात येणार असल्याचे महाराष्टÑ प्राथमिक शिक्षण परिषदेच्या पत्रात नमूद केले आहे.
या केंद्राला लागणारे साहित्य पुरवठादार म्हणून सारथी इंडस्ट्रीज, पुणे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
या शाळांमध्ये सुरू होणार विज्ञान केंद्र
जिल्ह्यात जि.प.शाळा निकुंभे, जि.प.शाळा वाघापूर, जि.प.शाळा मांडळ उर्दू शाळा साक्री, महानगरपालिकेची शाळा क्रमांक ५३, शिंदखेडा येथील न.प.उर्दू शाळा क्रमांक २ व शिरपूर येथील न.प.शाळा क्रमांक ५ या शाळांचा समावेश आहे.
ज्या शाळांमध्ये विज्ञान केंद्र उभारण्यात येणार आहे, त्या शाळांमध्ये विज्ञान विषय हाताळणारे शिक्षक, गट/शहर साधन केंद्रांतर्गत कार्यरत विज्ञान विषय साधन व्यक्ती, संबंधित कर्मचारी यांना नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्रातील साहित्याद्वारे शिकविणे, साहित्याची हाताळणी तसेच साहित्याच्या उपयोगितेबाबत १८ जून रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ यावेळेत होणार आहे. साहित्य पुरवठा करणारेच हे प्रशिक्षण देतील.
निवड झालेल्या जिल्ह्यातील सातही शाळांना पुरवठादारामार्फत विज्ञान साहित्याचा पुरवठा करण्यात आलेला आहे.