स्कूटरस्वार खासदारांना लोकवर्गणीतून चारचाकी, सामान्य गुरुजी बनले खासदार
By यदू जोशी | Published: April 7, 2024 07:46 AM2024-04-07T07:46:38+5:302024-04-07T07:47:46+5:30
बी. कॉम.पर्यंत शिक्षण झालेले घंगारे हे मूळचे वर्धा जिल्ह्यातील घोराडचे. पवनारच्या शाळेत ते शिकले.
यदु जोशी
१९९१ मध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. काँग्रेस राजीव गांधींच्या नेतृत्वात लढत होती. श्रीपेरंम्बदुरमध्ये राजीवजींची हत्या झाली आणि देश हादरला. काँग्रेसबद्दल सहानुभूतीची लाट होती. वर्धा लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ नेते आणि आधी याच मतदारसंघातून तीनवेळा खासदार राहिलेले वसंतराव साठे उमेदवार होते. तरीही पूर्वाश्रमीच्या एका सामान्य शिक्षकाने साठे यांचा धक्कादायक पराभव केला. ते होते कॉम्रेड रामचंद्र घंगारे!
बी. कॉम.पर्यंत शिक्षण झालेले घंगारे हे मूळचे वर्धा जिल्ह्यातील घोराडचे. पवनारच्या शाळेत ते शिकले. राजकारणात नंतर मोठे यश मिळवलेले दत्ताभाऊ मेघे हे घंगारेंचे वर्गमित्र. नागपूरच्या न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये काही वर्षे शिक्षक राहिल्यानंतर ते वर्धा जिल्ह्यात परतले आणि कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ काम करू लागले. १९६७ ते ७२ या काळात ते वर्धेचे आमदार राहिले आणि त्यानंतर तब्बल १९ वर्षांनी ते लोकसभा निवडणूक जिंकले. त्यावेळी सावलीसारखी त्यांची सोबत करणारे यशवंत झाडे यांनी सांगितले की, खासदार झाल्यानंतरही वर्षभर घंगारे साहेब स्कूटरवरच फिरत असत. मग पक्षाचे कार्यकर्ते, समाजाच्या विविध घटकांतील लोकांनी निधी जमा केला आणि त्यांना चारचाकी गाडी घेऊन दिली. राहण्या-वागण्यातील साधेपणा त्यांनी अखेरपर्यंत जपला. हिंगणघाटला एकदा रात्रीची सभा होती, त्यावेळी कडक आचारसंहिता नसायची.
रात्रीचे बारा वाजले तरी सभास्थानी रामचंद्र घंगारे येईनात. त्यांना यायला उशीर होत असल्याने सभा रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली. तेव्हा मोबाइल वगैरे नव्हतेच. घंगारे रात्री १ वाजता सभास्थानी पोहोचले. गावात पुन्हा दवंडी दिली गेली, जेवढे लोक घरी गेले त्यापेक्षा जास्त लोक सभेला आले अन् या गर्दीसमोर घंगारेंचे जोरदार भाषण झाले. एकदा त्यांचे कार्यकर्ते पहाटे ४ वाजेपर्यंत भिंती रंगवत होते. ५ वाजता ते झोपायला आले असता, गावातले लोक आले व आमच्या भिंती घंगारे साहेबांच्या प्रचारासाठी रंगवा, अशी विनंती केली. मग काय सकाळी ९ वाजेपर्यंत हे काम चालले. घंगारे यांचा सामान्य माणसांशी असा ‘कनेक्ट’ होता.