पोलीस ठाण्यांच्या आवारात भंगार वाहनं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 10:37 PM2019-04-13T22:37:04+5:302019-04-13T22:42:27+5:30
विदारक चित्र। वाहने मोकळ्या श्वासाच्या प्रतिक्षेत, मार्ग काढण्याची गरज
देवेंद्र पाठक ।
धुळे : पोलीस ठाण्यांच्या आवारात दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा भरणा वाढत असून प्रयत्न करुनही ते कमी होतांना दिसत नाही़ वेगवेगळ्या पध्दतीने जमा होणाऱ्या वाहनांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढत आहे़ परिणामी चांगल्या प्रकारची वाहने देखील भंगार होण्याच्या मार्गावर आली आहेत़ या सर्व पडून असलेल्या वाहनांचा प्रशासकीय पातळीवरुन लिलाव केल्यास त्याच्यातून मिळणाºया रकमेचा शासनाच्या गृह विभागाला निश्चित फायदा होऊ शकतो़
जिल्ह्यासह शहरातील पोलीस ठाण्यांचा आवार भंगार वाहनांनी व्यापलेला दिसतो़ वर्षानुवर्ष खितपत पडलेल्या या वाहनांनी पोलीस ठाण्याचे आवार वेढले आहे़ काही ठिकाणी तर जागाच उरली नसल्याने वाहनांवर वाहन ठेऊन चहुबाजुंनी इमले बांधले जात आहे़ पोलिसांकडून जप्त होणारी वाहने, चोरट्यांकडून हस्तगत केली जाणारी वाहने जमा होत असताना कागदपत्रांअभावी अशा वाहनांची संख्या वाढत आहे़ त्यामुळे पोलीस ठाण्यांचा आवार कितीही स्वच्छ केला तरी येथे गलिच्छता पसरलेली दिसते़ वर्षानुवर्ष पडलेली वाहने धुळीने माखली आहेत़ अशा वाहनांवर झाडांचा पालापाचोळा साठलेला दिसतो़ परिणामी या भागात घाणीचे साम्राज्य पसलेले आहे़ पोलीस ठाण्याच्या आवारात भंगार अवस्थेत पडून असलेल्या वाहनांचा निपटारा वेळीच करण्याची गरज आहे़ जिल्ह्यात, शहरातच नाही तर ही स्थिती राज्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या आवारात कमी-अधिक प्रमाणात सारखीच आहे़ पोलीस ठाण्याच्या आवारातील भंगार पडलेल्या वाहनांची माहिती संकलित करण्याचे काम पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी हाती घेतले होते़ आवार निश्चितच स्वच्छ होण्यास मदत होईल़ महसूलचा विनियोग करता येईल, एवढंच!
आता ही वाहने ठेवायची कुठे?
पोलीस ठाण्याच्या आवारात जमा होणाºया वाहनांची संख्या लक्षात घेता नव्याने जमा होणाºया वाहनांमुळे आता ही सर्व वाहने ठेवायची कुठे? असा प्रश्न संबंधित पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकाऱ्यांपुढे निर्माण होणे स्वाभाविक आहे़ यामुळे हा प्रश्न आता संपुष्टात आणण्यासाठी पोलीस
अधीक्षकांनी निर्णय घ्यायला हवा़
वाहन लिलावातून गृह विभागाला मिळू शकतो महसूल
न्यायालय, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी एकत्रित येऊन अशा वाहनांसंदर्भात समर्पक तोडगा काढण्याची आवश्यकता आहे़ कोणते वाहन पोलीस ठाण्यांच्या आवारात कोणत्या कारणामुळे उभे आहे याची माहिती संकलित करुन त्या सर्व वाहनांचा लिलाव केल्यास मिळणाºया रकमेतून लाभ मिळविता येईल़ सध्यस्थितीत शहरासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या आवारात जमा होत असलेल्या वाहनांची संख्या एकत्रित लक्षात घेतल्यास ती हजारोच्या संख्येत निश्चित असेल़ यात दुचाकी, तीन चाकीसह चार चाकी वाहनांसह काही ठिकाणी तर मोठे ट्रकदेखील आहेत़