शिंदखेडा तालुक्यात आघाडीच्या उमेदवारांची चाचपणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 11:40 AM2019-07-05T11:40:24+5:302019-07-05T11:40:42+5:30
भाजपतर्फे उमेदवाराचे नाव निश्चित असले तरी शिवसेनेकडूनही अनेकजण इच्छूक
भिका पाटील।
आॅनलाइन लोकमत
शिंदखेडा : विधानसभा निवणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झालेली आहे. भाजपतर्फे उमेदवार निश्चित असला तरी शिवसेनेकडूनही अनेकजण इच्छुक असल्याने चुरस निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे आघाडीतर्फे उमेदवार कोण? याची उत्सुकता तालुक्यातील मतदारांना लागून राहिलेली आहे.
गेल्या काही वर्षांपासून या मतदार संघावर भाजपाने घट्ट पकड बसविली आहे. या मतदारसंघातून यापूर्वी कॉँग्रेस, शिवसेना, अपक्ष उमेदवारांनी विजय मिळविला आहे. मात्र २००९ पासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही या मतदार संघातून भाजपच्या उमेदवाराला कॉँग्रेसच्या उमेदवारापेक्षा अधिक मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे भाजपच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. असे असले तरी कॉँग्रेस पक्षानेही या मतदारसंघात निवडणुकीच्यादृष्टीने जोरदार तयारी करण्यास सुरूवात केलेली आहे. भाजपतर्फे उमेदवाराचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. प्रश्न आहे तो आघाडीचा. गेल्यावेळी सर्वच पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेले होेते. मात्र या निवडणुकीत आघाडी आणि युती होणार असल्याचे स्पष्ट आहे. भाजपकडे हा मतदारसंघ असला तरी शिवसेनेचे काहीजण या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे जागेचा तिढा निर्माण होणार नाही ना? याकडेही लक्ष लागून आहे. तर आघाडीतील कॉँग्रेस-राष्टÑवादी या पक्षांपैकी कोणाला ही जागा सुटते, याकडेही सर्वांचेच लक्ष लागले आहे. कारण १९९० व १९९५ मध्ये या मतदारसंघातून कॉँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. राष्टÑवादीने या मतदारसंघातून गेल्यावेळी निवडणूक लढवली असली तरी या पक्षाला अद्याप विजय मिळालेला नाही. त्यामुळे यावेळी राष्टÑवादीकडे ही जागा जाणार का, यावरही खलबते सुरू आहेत. कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेस या दोन्ही पक्षात इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त आहे. त्यातून कोणाच्या पारड्यात उमेदवारी पडते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले आहे.
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेची निवडणुक चुरशीची होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी आतापासून सुरू केलेली आहे. निवडणुकीत यावेळी कोणाला कौल देतात, याची उत्सुकता लागली आहे.