चुरशीच्या सामन्यात़़़ विजयावर शिक्कामोर्तब़़़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 01:34 PM2019-10-25T13:34:45+5:302019-10-25T13:35:26+5:30

धुळे : निकाल ऐकण्यासाठी उमेदवारांच्या समर्थकांनी केंद्राबाहेर केली होती गर्दी, पोलिसांचा चोख बंदोबस्त

Seal victory over Churshi match | चुरशीच्या सामन्यात़़़ विजयावर शिक्कामोर्तब़़़

dhule

Next

धुळे : विधानसभा निवडणुकीत उमेदवार आणि त्यांच्याकडून होत असलेले आरोप-प्रत्यारोप यामुळे निवडणुक सुरुवातीपासून चुरशीची ठरली होती़ निकालानंतर चुरस संपली असलीतरी विजयावर दुपारी उशिराने प्रशासनाकडून शिक्कामोर्तब करण्यात आला़
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पाचही मतदार संघाकडे सर्वांचेच लक्ष लागून होते़ धुळ्यात चुरशीची ठरलेल्या निवडणुकीत सर्वांना मागे टाकत एमआयएमचे फारुक शाह यांनी बाजी मारली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला़ तर धुळे ग्रामीण मधून काँग्रेसचे विद्यमान आमदार कुणाल पाटील यांनी बाजी मारली़ त्यांनी भाजपच्या ज्ञानज्योती भदाणे यांचा पराभव केला़ तसेच साक्री मतदार संघातून अपक्ष उमेदवार मंजुळा गावित यांनी आघाडी घेत विजय संपादन केला़ शिरपूरमध्ये मात्र अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली काशिराम पावरा यांनी आपला ठसा पुन्हा एकदा उमटविला़ त्यांनी काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केल्यामुळे याकडे देखील तालुक्याचे लक्ष लागून होते़ तर शिंदखेड्यात मात्र विद्यमान मंत्री जयकुमार रावल यांनी मतांची आघाडी घेत आपला विजय नोंदविला़ विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला होता़
निमगुळ येथे कार्यकर्त्यांनी केला जल्लोष, आनंदोत्सव
निमगूळ : येथे जयकुमार रावल विजयी झाल्याबद्दल गावातील सर्व कार्यकर्त्यांनी गाव दरवाज्याजवळ एकत्र येऊन गुलालाचा वर्षाव केली आणि फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद लुटला़ याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती रघुवीर बागल, डॉ़ विरेंद्र बागल, हर्षवर्धन बागल, माजी उपसरपंच दीपक बागल, प्रा़ वसंत बागल, एस़ आऱ बागल, नंदलाल बागल, पंचायत समिती सदस्य भाग्यश्री बागल, प्रकाश सोनवणे, राजेंद्र साळवे, महेंद्र बाविस्कर, सागर बाविस्कर, अमोल मधुकर बागल आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले़ याप्रसंगी गावातील अबालवृद्धांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती़
आमदारांच्या समर्थकांना पोलिसांनी अडविले..
विजय झाल्याचे समजताच आमदार कुणाल पाटील मतमोजणी केंद्राजवळ आले. कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून जल्लोष केला. सर्वांना अभिवादन करून कुणाल पाटील मतमोजणी केंद्राकडे निघाले. त्यांच्यामागे समर्थकही जाऊ लागले. मात्र पोलिसांनी या समर्थकांना केंद्रात जाण्यास मज्जाव केला. आपल्या समर्थकांना रोखल्याचे बघून आमदार कुणाल पाटील माघारी फिरले. तापर्यंत उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी वरिष्ठांशी फोनवर चर्चा करून दोन समर्थकांना जाऊ द्यायचे का? अशी परवानगी वरिष्ठाकडे मागितली. त्याला होकार मिळताच दोन समर्थक कुणाल पाटील यांच्या समवेत आत गेले.
आमदार कुणाल पाटील यांच्या समर्थकांचा जल्लोष
धुळे ग्रामीण मतदार संघात पाच उमेदवारांमध्ये लढत असली तरी खरा सामना कॉँग्रेसचे कुणाल रोहीदास पाटील व भाजपच्या ज्ञानज्योती भदाणे यांच्यात होता. पहिल्याच फेरीत ज्ञानज्योती भदाणे यांनी ४५० मतांची आघाडी घेतली. मात्र नंतरच्या फेऱ्यांमध्ये त्यांना ही आघाडी टिकविता आली नाही. आठव्या फेरी अखेर त्यांनी ८४ मतांची आघाडी घेतली होती. त्यानंतर मात्र कुणाल पाटील यांनी सर्वच फेऱ्यांमध्ये मतांचा मोठा पल्ला गाठला. कुणाल पाटील विजयी होत असल्याचे बघून समर्थकांनी प्रचंड जल्लोष केला. अनेकांनी तिरंगा झेंडा हातात घेऊन विजयोत्सव साजरा केला. दुपारी २ वाजेच्या सुमारास आमदार कुणाल पाटील यांचे मतमोजणी केंद्रावर आगमन होताच कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

Web Title: Seal victory over Churshi match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे