धुळे शहरात कोरोनाचा दुसरा बळी, जिल्ह्यात मृतांची संख्या झाली तीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 12:04 PM2020-04-23T12:04:56+5:302020-04-23T12:05:17+5:30
एकाच दिवशी सात रूग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह
आॅनलाईन लोकमत
धुळे : धुळे शहरात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत आहे. हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलेल्या वडजाई रोड परिसरातील कोरोना बाधित ४५ वर्षीय रूग्णाचा गुरूवारी सकाळी मृत्यू झाला. कोरोनामुळे धुळे शहरात आतापर्यंत दोन तर जिल्ह्यात एकूण तीन जणांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान जिल्ह्यात एकाच दिवशी सात रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने, आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे.
धुळे शहरातील वडजाई रोडवरील गजानन कॉलनी परिसरातील एका ४५ वर्षीय व्यक्तीचे २० एप्रिल रोजी कोरोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्याला उपचारासाठी हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतांना त्याचा गुरूवारी सकाळी मृत्यू झाला. दरम्यान यापूर्वी साक्री येथील ५३ वर्षीय व धुळ्यातील मच्छिबाजार परिसरातील ५७ वर्षीय प्रौढाचा यापूर्वी मृत्यू झाला आहे.
एकाच दिवशी सात जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
जिल्ह्यात एकाच दिवशी सात नवे कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. यात धुळे शहरातील सहा व शिरपूर तालुक्यातील आमोदे येथील महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या आता १५वर पोहचली आहे.
शहरातील मच्छिबाजार परिसरातील ज्या कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झाला होता, त्याच्या परिवारातील सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.