दुसऱ्या लाटेत व्हेंटिलेटरवरील ३ हजारांपैकी २६० रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:28 AM2021-05-30T04:28:15+5:302021-05-30T04:28:15+5:30

धुळे - पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत अधिक मृत्यू झाले, तसेच व्हेंटिलेटरची गरज भासलेल्या रुग्णांची संख्याही जास्त आहे. दुसऱ्या लाटेत ...

The second wave killed 260 out of 3,000 patients on ventilators | दुसऱ्या लाटेत व्हेंटिलेटरवरील ३ हजारांपैकी २६० रुग्णांचा मृत्यू

दुसऱ्या लाटेत व्हेंटिलेटरवरील ३ हजारांपैकी २६० रुग्णांचा मृत्यू

Next

धुळे - पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत अधिक मृत्यू झाले, तसेच व्हेंटिलेटरची गरज भासलेल्या रुग्णांची संख्याही जास्त आहे. दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील ३ हजार कोरोनाबाधित रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज भासली असून त्यापैकी २६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

व्हेंटिलेटरचे ईटी ट्यूब आणि इम्यूडीफायर वेळोवेळी स्वच्छ करणे आवश्यक असते. येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालय, एसीपीएम वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात ईटी ट्यूब व इम्यूडीफायरची वेळोवेळी स्वछता केली जात असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळले. ट्यूब वेळोवेळी बदलवल्याने इन्फेक्शन वाढत नाही.

आतापर्यंत जिल्ह्यातील ६६४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या लाटेत ३१ जानेवारीपर्यंत ३९० रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर १ फेब्रुवारी ते २८ मे या कालावधीत २७४ रुग्ण दगावले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक व्हेंटिलेटर कोविड रुग्णालय असलेल्या भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय आहेत. याठिकाणी ५५ व्हेंटिलेटर आहेत तसेच एसीपीएम वैद्यकीय महाविद्यालयात ६ व्हेंटिलेटर आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत लक्षणे नसलेल्या रुग्णांचीच संख्या अधिक होती. तीव्र लक्षणे असलेल्या व व्हेंटिलेटरची गरज भासलेल्या रुग्णांची संख्या कमी होती. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून सुरू झालेली दुसरी लाट मात्र अधिक तीव्र होती.

सहा ते आठ तासांनी व्हायला हवी स्वछता -

व्हेंटिलेटरच्या ईटी ट्यूबची दर सहा ते आठ तासांनी स्वछता करणे गरजेचे असल्याचे आयसीयूतील तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.

- व्हेंटिलेटरमध्ये इम्यूडीफायर असते ते प्रत्येक आठवड्याला साफ केले पाहिजे. यामुळे दुसऱ्या रुग्णाला त्यापासून इन्फेक्शन होत नाही. तसेच प्रत्येक रुग्णाला नवीन ट्यूब वापरल्या पाहिजे.

हिरे महाविद्यालय -

कोविड रुग्णालय असलेल्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयात ५५ व्हेंटिलेटर आहेत. व्हेंटिलेटरची नियमित स्वच्छता होत असल्याची माहिती रुग्णांच्या नातेवाइकांनी दिली. तसेच इम्यूडीफायरचीही वेळोवेळी साफसफाई केली जाते.

एसीपीएम महाविद्यालय -

एसीपीएम महाविद्यालयात ६ व्हेंटिलेटर आहेत. व्हेंटिलेटरच्या ईटी ट्यूबची नियमित साफसफाई केली जाते. प्रत्येक रुग्णाला नव्या ट्यूब लावल्या जातात.

जिल्हा रुग्णालय -

साक्री रोड परिसरातील जिल्हा रुग्णालयात एक व्हेंटिलेटर कार्यरत आहे. व्हेंटिलेटरचे डिस्टिल वॉटर दररोज बदलले जाते. तसेच नियमित साफसफाई केली जाते.

डॉक्टर्स म्हणतात -

जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटरचे डिस्टिल वॉटर नियमित बदलले जाते. तसेच इम्यूडीफायर वेळोवेळी स्वच्छ केले जाते. प्रत्येक रुग्णाला नवीन नळी लावली जाते.

- डॉ. विशाल पाटील

जिल्ह्यात सर्वात जास्त व्हेंटिलेटर हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आहेत. तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार केले जात असल्याने व्हेंटिलेटरची नियमित स्वच्छता केली जाते.

- डॉ. दीपक शेजवळ

एसीपीएम महाविद्यालयात ६ व्हेंटिलेटर आहेत. १ मार्चपासून ३० बेडचा आयसीयू कार्यन्वित करण्यात आला आहे. ऑक्सिजन फ्लोमीटरची नियमित स्वच्छता केली जाते. प्रत्येक रुग्णाला नवीन एनएम फिल्टर दिला जातो. इम्यूडीफायरची वेळोवेळी स्वच्छता केली जाते.

- डॉ. रोहन कुलकर्णी, आयसीयू प्रमुख एसीपीएम महाविद्यालय

Web Title: The second wave killed 260 out of 3,000 patients on ventilators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.