लाकडांनी भरलेला ट्रक पकडला
By admin | Published: February 5, 2017 12:20 AM2017-02-05T00:20:10+5:302017-02-05T00:20:10+5:30
पारोळा रोड : शहर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाची कारवाई
धुळे : शहरातील पारोळा रोडवर शहर पोलिसांनी आंब्याची लाकडे घेवून जाणारा ट्रक पकडला़ ट्रकचालक व सहचालकाला लाकडाबद्दल माहिती देता न आल्याने व त्यांच्याकडे कुठलेही कागदपत्र नसल्याने पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून तो पुढील कार्यवाहीसाठी वनविभागाकडे सोपविला आहे.
शहरात गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून पोलीस अधीक्षक चैतन्या एस, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांनी त्यांच्या पथकाला गस्तीचे आदेश दिले होते. त्यानुसार उपनिरीक्षक डी.आर. सपकाळ, उपनिरीक्षक बैरागी, पो.कॉ. मच्छिंद्र पाटील, मुक्तार मन्सुरी, राहुल पाटील, चेतन सोनवणे हे शुक्रवारी पहाटे शहरात गस्त घालीत होते. त्यांना पहाटे 5़30 च्या सुमारास पारोळा रोडवरील गोपाल टी हाऊस समोरून (क्ऱ एम.एच.16/टी-2727) हा ट्रक जातांना दिसला. संशय आल्याने पथकाने ट्रक थांबवून तपासणी केली असता त्यात आंब्याचे लाकूड आढळून आले. सदरचे लाकूड कुणाचे आणि कोठून कोठे नेले जात आहे, याबाबत ट्रकचालक व त्याच्या साथीदाराला विचारणा केली असता त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. तसेच या लाकडासंबंधी कुठलीही कागदपत्रे त्यांच्याजवळ नव्हती. त्यामुळे त्यांनी ट्रकसह 80 हजार रूपये किंमतीचे लाकूड असा एकूण सुमारे 5 लाख 80 हजारांचा माल ताब्यात घेतला आहे. याबाबतची माहिती धुळे वन परिक्षेत्र अधिका:यांना दिली असून पुढील कारवाई त्यांच्या तक्रारीनंतर करण्यात येणार असल्याचे शहर पोलिसांनी सांगितल़े