शहादाच्या महिलेची सोनपोत धुळ्यातून लंपास; लाखांचा मुद्देमाल, शहर पाेलिसात गुन्हा
By देवेंद्र पाठक | Published: April 25, 2023 07:16 PM2023-04-25T19:16:48+5:302023-04-25T19:17:25+5:30
धुळ्यातील बसस्थानकात गर्दीचे प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्याच गर्दीचा फायदा घेत धुळे येथील मध्यवर्ती बसस्थानकातून पुन्हा एकदा महिलेची मंगल पोत लांबविण्यात आल्याची घटना घडली
धुळे : येथील बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत शहादा येथील कल्पनाबाई अहिरे या महिलेच्या गळ्यातील ९० हजार रुपये किमतीची सोनपोत चोरट्याने बसमध्ये लांबविली. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. चोरीचा हा प्रकार धुळ्यात घडल्याचे महिलेचे म्हणणे आहे. या प्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
धुळ्यातील बसस्थानकात गर्दीचे प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्याच गर्दीचा फायदा घेत धुळे येथील मध्यवर्ती बसस्थानकातून पुन्हा एकदा महिलेची मंगल पोत लांबविण्यात आल्याची घटना घडली. काही दिवसांपूर्वी चोरी करताना एका महिलेस रंगेहाथ पकडण्यात आले होते. तरीही चोरीच्या घटना थांबण्याचे नाव नाही. सध्या शाळांना सुट्या आहेत. तसेच आखादीनिमित्त प्रत्येेक बस, रेल्वेस्थानकात गर्दी ओसंडून वाहत आहे. यामुळे चोरट्यांना हात की सफाई करण्याची आयती संधी चालून आली आहे. कल्पनाबाई भरत अहिरे (वय ५७, रा. लक्ष्मीनगर, नाईक हायस्कूलच्या मागे, शहादा जि. नंदुरबार) या धुळे - शहादा बसमध्ये प्रवास करत असताना त्या महिलेची ९० हजार रुपये किमतीची सोन्याची मंगल पोत चोरट्याने लंपास केली. हा प्रकार धुळ्यातील बसस्थानकात घडल्याचे महिलेचे म्हणणे आहे. चोरीची ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी शहर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात सोमवारी रात्री ८ वाजता भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस हेड कॉन्स्टेबल एम. एस. पाटील घटनेचा तपास करीत आहेत.