शेवाळी येथे बैलाने घेतला बळीराजाचा जीव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 12:51 PM2017-10-19T12:51:06+5:302017-10-19T12:52:47+5:30
ऐन दिवाळीत घडलेल्या घटनेमुळे गावात व्यक्त होते आहे हळहळ
आॅनलाईन लोकमत
साक्री : ज्यास शेतकºयाचा जीवाभावाचा मित्र म्हटले जाते त्याच बैलाने अचानक केलेल्या हल्ल्यात छातीत शिंग घुसल्याने मालक असलेल्या शेतकºयाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील शेवाळी येथे घडली. प्रवीण श्यामराव भदाणे (४३) असे या शेतकºयाचे नाव आहे. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रवीण भदाणे गावातील प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जात. सकाळी ९ वाजेच्या सुमारास भदाणे शेतात बांधलेल्या आपल्या बैलांना चारापाणी करण्यास गेले होते. ते बैलांना चारा टाकत असताना बैलाने अचानक भदाणे यांच्यावर हल्ला केला. पहिलाच शिंगाचा वार त्यांच्या हृदयावर बसला. जबर मार लागल्याने ते जागीच कोसळले.
त्यांचा जीवाचा आकांत ऐकून जवळील शेतातील शेतकरी धावत आले. त्यांनी भदाणे यांना अत्यंत जखमी अवस्थेत उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. धुळे येथील खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी प्रयत्नांनी शर्थ केली. सहा तास भदाणे यांची मृत्यूशी झुंज सुरू होती.
परंतु अखेर नियतीपुढे ते हरले. त्यांच्या मृत्यूची बातमी कुटुंबास समजताच घरात व गावात शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात पत्नी, ११ वर्षांची मुलगी व चार वर्षांचा एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने घरातील कर्ता पुरुष गेल्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे.
कपड्यांऐवजी घरात आले पार्थिव
बैलांना चारापाणी करून भदाणे दिवाळी सणासाठी मुलांना नवे कपडे आणण्यासाठी जाणार होते. परंतु तत्पूर्वीच शेतात ही घटना घडल्याने घरात नव्या कपड्यांऐवजी त्यांचे पार्थिव पोहचले.
ज्या बैलाने त्यांच्यावर हल्ला केला, तो घरच्या गायीचा गोºहा होता. त्यालाही भदाणे यांनी मुलाबाळांप्रमाणेच पालनपोषण करून वाढविले होते. मात्र तोच त्यांच्या जीवावर उठला. या घटनेमुळे ग्रामस्थ सुन्न झाले आहेत.