शिरपूरचा अक्षय अग्रवाल देशात ४३ वा तर राज्यात दुसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 01:39 PM2019-04-06T13:39:12+5:302019-04-06T13:39:42+5:30
दिल्ली येथे अर्थमंत्रालयात नियुक्ती
धुळे : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत येथील अक्षय सुनील अग्रवाल या तरुणाने देशात ४३ वा तर राज्यात त्याने दुसरा क्रमांक पटकावला आहे.
अक्षयने सलग दुसऱ्यांदा या परीक्षेत यश मिळविले. सहा महिन्यांपूर्वी आय.ई.एस. परीक्षेत देशातून चौथा तर राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला होता. त्याची दिल्ली येथे अर्थमंत्रालयात नियुक्ती झाली असून १ मार्चपासून त्याचे प्रशिक्षण सुरू आहे.
अक्षयने बालवाडी ते १०वीपर्यंतचे शिक्षण येथील आर.सी.पटेल इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये तर ११वी-१२वीचे शिक्षण येथीलच आर.सी. पटेल कनिष्ठ महाविद्यालयात घेतले आहे. अक्षय हा येथील व्यावसायिक सुनील रतनलाल अग्रवाल व लता अग्रवाल या दाम्पत्याचा मुलगा आहे. शहराच्या शिरपेचात पुन्हा मानाचा तुरा खोवल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे