शिंदखेडा कोविड केंद्रावर ऑक्सिजन सिलिंडर व रुग्णवाहिकेची शिवसेनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:34 AM2021-05-01T04:34:02+5:302021-05-01T04:34:02+5:30
शिंदखेडा - तालुक्यातील रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेल्या कोविड केंद्रात आरोग्य सुविधा वाढविण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे ...
शिंदखेडा - तालुक्यातील रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेल्या कोविड केंद्रात आरोग्य सुविधा वाढविण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
शिंदखेडा कोविड केंद्रात सुविधांचा अभाव असल्याने तालुक्यातील रुग्णांना उपचारासाठी इतरत्र जावे लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. कोविड केंद्रावर फक्त पाच ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध आहेत. मात्र, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त असल्याने ते पुरेसे नाहीत. रुग्णांची संख्या पाहता पन्नास ते साठ सिलिंडरची गरज आहे. तसेच औषधींचीही कमतरता आहे. त्यामुळे रुग्ण आल्यानंतर त्यांना इतरत्र हलविण्यात येते. ग्रामीण भागातील रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलविण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने खासगी वाहनांची मदत घ्यावी लागते. आर्थिक परिस्थिती नाजूक असणाऱ्या रुग्णाला त्याचा मोठा फटका बसतो. त्यासाठी कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी तसेच लसीकरणाचा वेग वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवभोजन थाळी पुरवठादारांचे नुकसान होत आहे. त्याबाबत सकारात्मक विचार करावा, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर शानाभाऊ सोनवणे, शहरप्रमुख सागर देसले, डॉ. भारत राजपूत, नंदू पाटील यांच्या सह्या आहेत.
रिक्त पदे तत्काळ भरा
येथील रुग्णालयात अनेक पदे रिक्त आहेत. त्यात, वैद्यकीय अधिकारी वर्ग- १ चे १ पद, वैद्यकीय अधिकारी वर्ग- २ चे २ पद, अधिपरिचारिका ३, प्रयोगशाळा तंत्रज्ञ वर्ग- १, कनिष्ठ लिपिक २, कक्षसेवक १, सहायक १ आदी पदांचा समावेश आहे. तसेच एम.डी. आणि एम. एस. डॉक्टरांची नितांत आवश्यकता असल्याचे निवेदनात म्हटले आहे.